पृथ्वीराज माळी यांच्या बहारदार शाहीरीने बोपोडीत रंगली सांस्कृतिक मैफल
पुणे, 17 एप्रिल (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) यांच्या वतीने आयो
पुणे


पुणे, 17 एप्रिल (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) यांच्या वतीने आयोजित केलेल्या संयुक्त जयंती महोत्सवात आज शाहीरी, लोकसंगीताच्या माध्यमातून महामानवांच्या विचारांचा जागर करण्यात आला. शाहीर पृथ्वीराज माळी यांच्या बहारदार कार्यक्रमात पारंपारिक व आधुनिक सादरीकरणांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिष्ठाता डॉ. विजय खरे, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष उपमहापौर परशुराम वाडेकर, रिपब्लिकन पक्षाचे अविनाश कदम, उमेश कांबळे, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, सामाजिक कार्यकर्ते शैलेन्द्र कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ढोलकी वादन आणि पारंपारिक डफ वादनाने झाली. या वादनांनी उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. त्यानंतर भीमगीतांच्या सादरीकरणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला.

“मानाचा मुजरा घ्या”, “सोनियाची उगवली सकाळ”, “धम्मदीप हा मानवतेचा”, “दोनच राजे इथे गाजले” यांसारख्या गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच “जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी” आणि “बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले” या गीतांमधून सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.

कार्यक्रमातील “तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं” आणि “राजा राणीच्या जोडीला” या गीतांनाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “शौर्यराज माळी” या बालकलाकाराच्या सादरीकरणाने विशेष दाद मिळवली, तर “चांदण्याची काया” या सादरीकरणाने वातावरणात वेगळीच रंगत आणली.

संयुक्त जयंती महोत्सवाचा समारोप शनिवारी लोककला दर्शन या कार्यक्रमाने होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande