
चंद्रपूर, 02 एप्रिल (हिं.स.) : जिवती तालुक्यातील वनजमीन धारक शेतकऱ्यांचा आवाज संसदेत उठवताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी वनहक्क कायद्यांतर्गत 'तीन पिढ्यांच्या पुराव्याची' अट अत्यंत जाचक असल्याचे सांगितले आणि या अटी रद्द करून प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे जमिनीचे पट्टे देण्याची आग्रही मागणी केली.
लोकसभेत बोलताना प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, जिवती तालुक्यातील शेतकरी वर्षानुवर्षे घाम गाळत आहेत, मात्र जमिनीचे पट्टे मिळवण्यासाठी ७५ वर्षांचे किंवा तीन पिढ्यांचे पुरावे मागणे ही अट अत्यंत अन्यायकारक आहे. अनेक गरीब शेतकऱ्यांकडे जुने कागदपत्रे नसल्याने त्यांचे हक्क फेटाळले जात आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, वनविभागाच्या जाचक नियमांमुळे शेतकरी हक्काच्या जमिनीपासून दूर राहत असून, शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळे कायद्यात सुधारणा करून प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क मिळावा, अशी मागणी त्यांनी संसदेत केली.
शेतकरी हा देशाचा कणा आहे. जोपर्यंत जिवतीमधील शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आणि त्यांना जमिनीचे पट्टे मिळत नाहीत, तोपर्यंत माझा लढा संसदेत आणि बाहेरही सुरू राहील, असे ठामपणे प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले. या मागणीमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील वनजमीन धारक शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव