रायगडमध्ये पेट्रोल-डिझेल खुली विक्री बंद; अफवांवर नियंत्रणासाठी प्रशासनाचा कठोर निर्णय
रायगड, 02 एप्रिल (हिं.स.) : समाजमाध्यमांवर पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा वेगाने पसरत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलची खुली विक्री तात्काळ बंद करण्य
Curbing rumors of fuel shortage; District Collector's big decision


रायगड, 02 एप्रिल (हिं.स.) : समाजमाध्यमांवर पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा वेगाने पसरत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलची खुली विक्री तात्काळ बंद करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्वलनशील पदार्थांच्या मुक्त विक्रीमुळे अनुचित घटना घडू शकतात, या पार्श्वभूमीवर हा आदेश जारी करण्यात आला आहे. पेट्रोलियम नियम, 2002 अंतर्गत अधिकारांचा वापर करून सर्व पेट्रोल पंप चालकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

नव्या आदेशानुसार, पेट्रोल व डिझेलची विक्री केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच केली जाणार आहे. कॅन, बाटली किंवा इतर कोणत्याही कंटेनरमध्ये इंधन भरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे आणि विक्रीची अचूक नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याशिवाय, अनधिकृतपणे पेट्रोल-डिझेल साठवणूक करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास पेट्रोलियम नियम 2002, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत तो लागू राहणार आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande