
सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाला मिळणार दिशा, मुख्यमंत्री उपस्थित राहणार
नाशिक, 02 एप्रिल (हिं.स.)।
येऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीची ४ व ५ एप्रिल रोजी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. देशभरातील साधू, संत व महंत मोठ्या संख्येने या परिषदेस उपस्थित राहणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.नाशिक येथील श्री स्वामीनारायण मंदिर, BAPS, के.बी.एच. डेंटल कॉलेजच्या पाठीमागे, तपोवन येथे होणारी ही राष्ट्रीय बैठक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे नियोजन करण्यात येत असून प्रशासन आणि संत समाज यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो देशाच्या आध्यात्मिक परंपरेचा भव्य उत्सव आहे. त्यामुळे या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी साधू-संतांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरते. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये सुरू असलेल्या रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, निवास व्यवस्था, वाहतूक सुविधा आदी विविध विकासकामांना अंतिम स्वरूप देताना संत समाजाच्या सूचनांना विशेष प्राधान्य दिले जात आहे. परंपरा आणि आधुनिक सुविधा यांचा समतोल राखत कुंभमेळा अधिक सुव्यवस्थित आणि भव्य करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री पूज्य स्वामी श्री जितेंद्रानंद सरस्वतीजी महाराज यांची मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच भेट घेऊन बैठकीच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री श्री.माधव राठी उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संतसमाजाचे मार्गदर्शन पुढील वाटचालीसाठी निश्चितच बळ देणारे ठरेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.या राष्ट्रीय बैठकीत कुंभमेळ्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असून साधू-संतांच्या निवासव्यवस्था, धार्मिक परंपरांचे जतन, शिस्तबद्ध आयोजन, भाविकांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेतले जाणार आहेत. तसेच अखिल भारतीय संत समितीच्या आगामी राष्ट्रीय परिषदांच्या आयोजनाबाबतही या बैठकीत रूपरेषा निश्चित होण्याची शक्यता आहे.एकूणच, नाशिकमध्ये होणारी ही राष्ट्रीय बैठक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाला ठोस दिशा देणारी ठरणार असून प्रशासन आणि संतसमाज यांच्या संयुक्त प्रयत्नांतून एक भव्य, दिव्य आणि सुव्यवस्थित कुंभमेळा साकारण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.सदर संत समितीचे राष्ट्रीय बैठकीच्या नियोजनासाठी आज दि.२ रोजी महापौर हिंमगौरी आडके यांच्या उपस्थितीमध्ये, ज्येष्ठ पदाधिकारी व सर्व नगरसेवक यांची बैठक संपन्न झाली असून विविध समित्या समन्वयासाठी गठित करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV