भाजयुमोच्या युवा शक्ती जागर यात्रेला 21 एप्रिलपासून प्रारंभ - कृष्णराज महाडिक
मुंबई, 20 एप्रिल (हिं.स.) - राज्यातील युवावर्गासह शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवक - युवतींशी संवाद साधण्यासाठी 21 एप्रिलपासून राज्यव्यापी युवा शक्ती जागर यात्रेचा प्रारंभ होत असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चा प्र
कृष्णराज महाडिक


मुंबई, 20 एप्रिल (हिं.स.) - राज्यातील युवावर्गासह शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवक - युवतींशी संवाद साधण्यासाठी 21 एप्रिलपासून राज्यव्यापी युवा शक्ती जागर यात्रेचा प्रारंभ होत असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी घोषित केले. या यात्रेच्या प्रारंभावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. महाडिक बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर, सहमाध्यम प्रमुख ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते.

युवा शक्ती जागर यात्रेसंदर्भात माहिती देताना श्री. महाडिक म्हणाले, दीड महिन्यापूर्वी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राज्यातील सर्व मंत्री, आमदार, केंद्रातील मंत्र्यांची भेटी घेतल्या. त्याचप्रमाणे दिल्ली विद्यापीठासह अनेक ठिकाणच्या विद्यार्थी आघाड्यांना आमंत्रण दिले. युवा मोर्चाच्या माध्यमातून युवा पिढी जोडण्यासाठी आपल्याला फार मोठी संधी असल्याचे लक्षात आल्याने युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि भाजपा नेत्यांनी परिश्रम घेऊन या राज्यव्यापी युवा शक्ती जागर यात्रेची आखणी केल्याची माहिती श्री. महाडिक यांनी दिली.

युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांना भेटतो तेव्हा मला त्यांच्यात उत्साह आणि उर्जा पाहायला मिळत असल्याने या दौऱ्याचे नाव युवा शक्ती जागर यात्रा ठेवले. या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन विचारपूर्वक केले आहे. त्यात केवळ पदाधिकाऱ्यांना भेटणार नसून शेतकरी, महिलांशी चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवक युवतींना भेटणार आहोत. या सर्व लोकांच्या समस्या जाणून घेत आम्हाला विद्यार्थी, युवा आणि सरकारमधला सेतू व्हायचे आहे. पुढील एक वर्षात संपूर्ण राज्यातील एक लाख युवकयुवतींना या माध्यमातून युवा मोर्चा आणि पक्षाशी जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे श्री. महाडिक यांनी सांगितले.

दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात नवी मुंबई, पनवेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असा संपूर्ण कोकण पट्टा पूर्ण केला जाईल. हा पहिला भाग झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ हे राज्यातील विभाग पूर्ण केले जातील. शासकीय 36 जिल्ह्यांचे म्हणजेच भाजपाच्या संघटनात्मक 80 जिल्ह्यांच्या दृष्टीने या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले असून हा दौरा यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

युवा मोर्चा हा केवळ राजकीय विषय नाही. आम्ही रोजगारावरही काम करणार आहोत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी आणि क्रीडा विषयावर काम करणार असल्याचे सांगून श्री.महाडिक म्हणाले की अवघ्या दीड महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळपास 22 हजार सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या 2047 पर्यंतच्या विकसित भारतच्या स्वप्नात युवा मोर्चा कशा पद्धतीने योगदान देऊ शकेल, या दृष्टीने आम्ही विचार करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्यात वेगाने विकास होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर धोरणविषयक चर्चेत युवकांचा आवाज कसा उठवता येईल, या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. युथ पार्लमेंटच्या माध्यमातून मुख्यमंत्री अथवा मंत्रीमहोदयांना आमंत्रित करून युवकांचा आवाज हा शासनापर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande