
नांदेड, 23 एप्रिल (हिं.स.)
तामसा ते अर्धापूर मार्गावर एका भरधाव कारने भीषण उत्पात घडवला. चालकाचा ताबा सुटलेली कार रस्त्यालगतच्या एका आखाड्यात घुसल्याने, तिथे विश्रांतीसाठी बसलेल्या ३८ वर्षीय शेतमजूर महिलेला कारने चिरडले. या हृदयद्रावक घटनेत गंभीर जखमी झालेल्या मंगलबाई साहेबराव शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण लोण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोण ता. अर्धापूर येथील रहिवासी असलेल्या मंगलबाई साहेबराव शिंदे
(वय ३८ वर्षे) या आखाड्यात विसाव्यासाठी बसल्या होत्या. त्याच वेळी तामसाहून अर्धापूरच्या दिशेने जाणारी एक कार अत्यंत वेगात होती. अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार रस्त्यावरून थेट आखाड्याच्या दिशेने झेपावली.
काही समजण्यापूर्वीच या कारने मंगलबाईंना जोरदार धडक दिली आणि काही अंतरापर्यंत फरफटत नेले. हा अपघात इतका भीषण होता की मंगलबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि आखाड्याचेही मोठे नुकसान झाले. अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी
घटनास्थळी मोठी गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमी मंगलबाईंना स्वतःच्या वाहनात टाकून तातडीने नांदेड येथील रुग्णालयात हलवले. नांदेड येथील रुग्णालयात डॉक्टरांनी मंगलबाईंवर उपचार सुरू केले, मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. एका कष्टकरी महिलेचा असा अचानक आणि भीषण अंत झाल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis