
बीड, 25 एप्रिल, (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आपल्या संलग्न महाविद्यालयांना २६ एप्रिलपासून उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्या असून पुढील वर्षाचे शैक्षणिक वेळापत्रकही प्रसिद्ध केले आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्षाचे नियोजन करण्यात आले असून विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील पदव्युत्तर विभागांना २ मे पासून सुट्ट्या लागू होतील. संलग्नित बीड, धाराशिव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांना १४ जूनपर्यंत सुट्टी असेल. नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून २०२६ पासून सुरू होणार असल्याची अधिकृत माहिती उपकुलसचिव डॉ. संजय कवडे यांनी दिली आहे.
आगामी वर्षात ३१ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल तर ऑक्टोबरमध्ये युवक महोत्सव आणि दीक्षांत समारंभ पार पडेल. शैक्षणिक वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करण्याच्या उद्देशाने प्रथम सत्राच्या परीक्षा २१ ऑक्टोबरपासून सुरू होतील, असेही विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असून यामुळे शैक्षणिक कार्यात सुसूत्रता येणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis