लातूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची व्यापक बैठक संपन्न
लातूर, 03 एप्रिल (हिं.स.)। लातूर शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच उत्सव शांततामय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा यास
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती


लातूर, 03 एप्रिल (हिं.स.)। लातूर शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच उत्सव शांततामय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून पूर्वतयारीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथील मीटिंग हॉलमध्ये शांतता समितीची सविस्तर बैठक आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीस पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) साळवे, तसेच लातूर शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रम, मिरवणुका, सांस्कृतिक उपक्रम आणि सार्वजनिक सहभाग लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षात्मक व प्रशासकीय उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. मिरवणुकीचे मार्ग निश्चित करणे, संवेदनशील ठिकाणांची ओळख करून त्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करणे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची आखणी करणे, तसेच ध्वनीप्रदूषण नियंत्रणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करणे यावर विशेष भर देण्यात आला.

पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नमूद केले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती हा समाजातील सर्व घटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा उत्सव असून तो शांततेत व कायद्याच्या चौकटीत राहून साजरा करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवा, गैरसमज किंवा अनुचित घटनांना थारा न देता नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी समन्वय राखावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मिरवणुकी दरम्यान कोणतेही जयंती मंडळ ध्वनी मर्यादा ओलांडणार नाही याची काळजी घेतील. जे कोणी मिरवणुकीत ध्वनीची मर्यादा ओलांडतील अशा जयंती मंडळाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मोटरसायकल रॅली न काढता पायी रॅली काढण्यात यावी असेही आवाहन करण्यात आले.

अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी देखील उपस्थितांना सूचित केले की, उत्सवादरम्यान सामाजिक सलोखा अबाधित ठेवणे अत्यंत आवश्यक असून कोणत्याही प्रकारचा वाद टाळण्यासाठी संयम व शिस्त राखावी. तसेच आयोजकांनी मिरवणूक वेळेत पूर्ण करावी, ध्वनी मर्यादा पाळाव्यात आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान उपस्थित उत्सव समित्यांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक यांनीही आपले मत व्यक्त करत पोलीस प्रशासनास पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. विविध समित्यांनी उत्सव अधिक सुव्यवस्थित आणि अनुशासित पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

या बैठकीस शहरातील विविध भागांतील उत्सव समित्यांचे पदाधिकारी, मान्यवर नागरिक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लातूर पोलीस प्रशासनाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक ते सर्व बंदोबस्त, गस्त पथके, सीसीटीव्ही नियंत्रण, तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार असून नागरिकांनीही जबाबदारीने व शांततेने उत्सव साजरा करावा, असे आवाहन शेवटी करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande