
नागपूर, 03 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रीय जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेने कडक भूमिका घेतली आहे. जनगणनेच्या कामात टाळाटाळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
शहरातील महापालिकेच्या सर्व 10 झोनमध्ये प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अद्याप कामावर रुजू न झाल्याचे समोर आले आहे.महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माहितीनुसार, काही शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय व निमशासकीय संस्था सहकार्य करण्यास तयार नाहीत. काही संस्थांनी प्रगणक आणि पर्यवेक्षक नियुक्तीचे आदेश स्वीकारण्यास नकार दिला आहे, तर काही ठिकाणी अपूर्ण किंवा कमी संख्या दर्शविणाऱ्या यादी सादर केल्या जात आहेत. विशेषत: भवन्स, सिव्हील लाईन्स, भारतीय कृष्ण विद्या विहार, तेलंगखेडी, मदन गोपाल अग्रवाल, सिताबर्डी, सेंटर पॉईंट, आणि सेमिनरी हिल्स या संस्थांकडून अद्याप यादी सादर झालेली नाही.यापार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी सर्व 10 झोनच्या सहायक आयुक्तांना कडक निर्देश दिले आहेत. जनगणना 2027 संदर्भातील शासकीय आदेशांचे पालन न करणाऱ्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेने सर्व शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांच्या विभाग प्रमुखांना तातडीने आदेशांचे पालन करण्याचे आणि अन्यथा नियमानुसार कठोर कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी