
जळगाव, 03 एप्रिल (हिं.स.) जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे केळीसह इतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना सरकार आणि स्थानिक मंत्री-आमदार केवळ राजकारणात मग्न असल्याची खरपूस टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावेळी गिरीश महाजन यांच्यावरही हल्ला चढवला. शेतकऱ्यांवर संकट आल्यावर ‘संकटमोचक’ कुठे असतात? असा बोचरा सवाल राऊत यांनी केला. संजय राऊत हे जळगाव दौऱ्यावर आहेत. आज यांनी जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, कालच्या अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. अशावेळी सरकार, पालकमंत्री किंवा आमदारांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी पावले उचलणे गरजेचे होते. पंजनामे आणि मोजण्या होतील, पण त्यातून शेतकऱ्यांच्या तातडीच्या अडचणी सुटणार नाहीत. शेतकऱ्यांच्या घरात हाहाकार माजला असताना सरकार अत्यंत असंवेदनशील असल्याचा आरोप त्यांनी केला.यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर हल्ला चढवला.संकटमोचक म्हणतात ते गिरीश महाजन कुठे आहेत? शेतकऱ्यांच्या संकटात हे मोचक कुठे असतात? राजकारणात फक्त राजकीय संकटमोचक असतात का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, जनतेवर संकट येते, शेतकऱ्यांवर संकट येते तेव्हा हे संकटमोचक काही करताना दिसत नाहीत. फक्त आमदार पळवणे, नगरसेवक पळवणे, पक्ष फोडणे हे संकटमोचकाचे कर्तव्य आहे. हे राज्याचे आणि संपूर्ण जिल्ह्याचे दुर्दैव आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर