
परभणी, 03 एप्रिल (हिं.स.) : आर्थिक अडचणी असूनही कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असलेल्या वडिलांच्या कष्टाचे चीज करत, पूर्णा तालुक्यातील अजदापुर येथील सीमा नामदेव हिवरे यांनी पोलिस भरतीत महिला शिपाई पद मिळवले आहे. या यशामुळे संपूर्ण परिसरात कौतुक होतेय.
मजुर म्हणून दिवसरात्र मेहनत करून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलांच्या संघर्षाची जाणीव ठेवून, सीमाने चिकाटी, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ही उपलब्धी मिळवली आहे. वयाच्या फक्त २१व्या वर्षी तिने आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे.
सीमाचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक पासून सुरू झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण पूर्णा येथील अभिनव शाळेत झाले, तर बारावीपर्यंतचे शिक्षण श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात पूर्ण केले. बारावी परीक्षेत ८२ टक्के गुण मिळवून तिने महाविद्यालयात द्वितीय क्रमांक पटकावला होता. शिक्षणाबरोबरच खेळात रस असलेल्या सीमाने पोलीस दलात सेवा करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून परभणी येथील संघर्ष अकॅडमीत प्रशिक्षण घेतले. कठोर सराव आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर तिने पोलिस भरती प्रक्रियेत महिला शिपाई पद मिळवले.
सीमाच्या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रमंडळी, गुरुजन आणि प्रशिक्षकांनी तिला अभिनंदन केले असून, तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis