
परभणी, 03 एप्रिल, (हिं.स.)। राज्यात पत्रकारांवर वाढत असलेल्या हल्ले आणि धमक्यांच्या घटनांच्या निषेधार्थ ‘व्हाईस ऑफ मीडिया’ संघटनेने राज्यव्यापी धरणे आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवर परभणी येथे मंगळवार (दि. ७ एप्रिल) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हास्तरीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती राज्याचे कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी दिली.
या संदर्भात संघटनेची बैठक शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) परभणीत पार पडली. राज्यसहचिटणीस सुरज कदम, राज्य सह संघटक विजय पाटील, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली.
बैठकीत बोलताना विजय चोरडिया यांनी सांगितले की, राज्यभरात पत्रकारांवर हल्ल्यांच्या घटना वाढत असून त्यांना धमकावणे, खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. पत्रकार सुरक्षा कायदा २०१९ ची प्रभावी अंमलबजावणी करावी, पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अधिस्वीकृतीसाठी असलेल्या अटी शिथिल कराव्यात, ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी तसेच लघु दैनिक व साप्ताहिकांच्या जाहिरात दरात वाढ करावी, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
जिल्हास्तरावर होणाऱ्या या आंदोलनात जिल्हा कार्यकारिणीसह सर्व तालुक्यांतील पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.या बैठकीस मराठवाडा कार्यकारिणी पदाधिकारी विशाल माने, सुरेश जंपनगिरे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण, बालासाहेब काळे, नरहरी चौधरी, राजन मंगरूळकर, मारुती जुंबडे, विजय कुलकर्णी, सुधीर बोर्डे, लक्ष्मीकांत रासवे, विष्णू सायगुंडे, दिलीप बोरुळ, ज्ञानेश्वर उंडाळ, अनिल अहिरे, रियाज कुरेशी आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis