मानवी मनाच्या परिसीमा जिथे संपतात, तिथे संतांच्या भूमिका सुरू होतात - श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर
परभणी, 03 एप्रिल, (हिं.स.)। सेलू येथील महेशनगरमधील श्री साईबाबा मंदिर संस्थान येथे खारकर परिवाराच्या वतीने व वसंत प्रतिष्ठान आयोजित ‘पसायदान’ या त्रिदिवसीय प्रवचनमालेस प्रारंभ झाला. पंढरपूर येथील श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आपल्या अमृतमय
“मानवी मनाच्या परिसीमा जिथे संपतात, तिथे संतांच्या भूमिका सुरू होतात” — श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर


परभणी, 03 एप्रिल, (हिं.स.)। सेलू येथील महेशनगरमधील श्री साईबाबा मंदिर संस्थान येथे खारकर परिवाराच्या वतीने व वसंत प्रतिष्ठान आयोजित ‘पसायदान’ या त्रिदिवसीय प्रवचनमालेस प्रारंभ झाला. पंढरपूर येथील श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आपल्या अमृतमय वाणीतून प्रवचनमालेची सुरुवात करताना “मानवी मनाच्या परिसीमा जिथे संपतात, तिथे संतांच्या भूमिका सुरू होतात,” असे प्रतिपादन केले.

प्रवचनमालेचे हे सातवे वर्ष असून ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवीवर तीन दिवसांची सखोल व्याख्यानमाला घेण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. पहिल्या दिवशी सातव्या ओवीचे रसग्रहण करण्यात आले असून, ही प्रवचनमाला शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस पुढे सुरू राहणार आहे. या प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश खारकर व सचिव ॲड. उमेश खारकर यांनी केले आहे.

प्रवचनात बोलताना महाराजांनी ‘पसायदान’चे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सुमारे ७०० वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत आणि पुढील अनेक वर्षेही ते मानवकल्याणासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. ‘किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिन्ही लोकी…’ या ओवीतून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाची भावना व्यक्त करण्यात आली आहे. “माणसाने कर्मठ नव्हे तर कर्मनिष्ठ असावे, तसेच संतांची संगत स्वीकारावी,” असा संदेशही त्यांनी दिला. ‘पसायदान’मधील ‘किंबहुना’ या शब्दाचा सविस्तर अर्थ त्यांनी श्रोत्यांना समजावून सांगितला. या प्रवचनावेळी अभंग गायन सखाराम उमरीकर, हार्मोनियम वादन शंतनु पाठक, तबला वादन गिरीश दीक्षित, तर बासरी वादन अर्जुन कसाब यांनी साथ दिली. सद्गुरू पूजन वसंत प्रतिष्ठानच्या वतीने महेश खारकर व ॲड. उमेश खारकर यांच्या हस्ते करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande