
लातूर, 30 एप्रिल (हिं.स.)।
लातूर शहरालगत असलेल्या नवीन वस्त्या आणि गावांमध्ये शहराप्रमाणेच दर्जेदार सोयीसुविधा पुरवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हद्दवाढीच्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिक सुविधांपासून वंचित राहू नयेत, यासाठी आमदार निधीतून एकत्रित मोठी तरतूद करुन विकासकामांना चालना देण्यात येत आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत महाराणाप्रताप नगर (बुऱ्हाण नगर) येथील १ कोटी ६० लाख रुपये निधीतून मंजूर विविध विकासकामांचे भूमीपूजन आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते आणि खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
लातूर शहरालगत असलेल्या नवीन वस्त्या व गावामध्ये शहराप्रमाणेच सोयीसुविधा पुरवण्याचा उद्देश ठेवून, महाराणाप्रतापनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध वस्त्यांमध्ये मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी आमदार निधीमधून एकत्रितरित्या तरतूद केली आहे. एकाच वेळी अनेक योजना एका गावात राबवल्यास त्या कामांचा दर्जा चांगला राहून नागरिकांना दीर्घकाळापर्यंत सोयी सुविधांचा लाभ घेता येऊ शकतो, असा विचार करून एकाच गावात मोठ्या प्रमाणात विकास योजनांचा शुभारंभ करण्यात येत असल्याचे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेबूब साकोळकर यांची उपस्थिती होती तर लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर स्नेहल उटगे, स्थायी समितीचे सभापती सचिन बंडापल्ले, परिवहन समितीचे सभापती फैसलखान कायमखानी, सभागृह नेते विजयकुमार साबदे, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हा. चेअरमन अँड समद पटेल आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, महाराणा प्रताप नगर, बुऱ्हाण नगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर शहरानजीक असलेल्या नवीन वस्त्यांमध्ये, हद्दीत नाही म्हणून महानगरपालिका योजना राबवून शकत नाही आणि संबंधित ग्रामपंचायतीलकडे तेवढा निधी नसतो, त्यामुळे अशा झालर क्षेत्रातील नागरिक सुविधा पासून वंचित राहतात, या नागरिकांना सर्व सुविधा पुरवण्याचे आश्वासन मी दिले होते त्या आश्वासनाला अनुसरून दुर्लक्षित होत असलेल्या सर्व प्रकारच्या योजना राबविण्यात येतील, शहरानजीकच्या गावातील पाणीपुरवठा व इतर योजना प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, दर्जेदार रस्त्यांनी गावे जोडण्यात येतील, सिटीबस व इतर सुविधा पुरवल्या जातील, लातूर शहर व जिल्ह्यात शांतता सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा कायम राखून विकास प्रक्रिया गतीमान ठेवली जाईल अशी ग्वाही याप्रसंगी दिली.
यावेळी पूढे बोलतांना ते म्हणाले, लातूर शहरातील सर्व सामान्य माणसाच्या वसाहतीमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा करिता निधी मंजूर केल्याच आम्हाला समाधान असून स्थानिक कार्यकर्त्यांनी सुचवलेल्या १६ कामांना आम्ही मंजुरी दिली. यातील काही कामे खासदार निधीतूनही केली जाणार असून महानगरपालिका बैठकीत सूचना केल्या की, येथील झालर क्षेत्राचा नवा आराखडा तयार करावा, महानगरपालिकेकडून लातूरच्या बाहेर देखील विकासाच्या योजना कायद्यानुसार राबवता येतात आणि त्या राबवाव्यात, या भागातील नागरिकांना सिटी बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या हद्दवाडीत तुमच्या भागाचा समावेश होईल या भागाचा चेहरा मोहरा बदलण्यात येईल कष्टकरी आता लखपती करोडपती झालेला आहे कारण येथील जागेचा भाव वाढलेला आहे असेही ते यावेळी म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis