
अमरावती, 30 एप्रिल (हिं.स.) : एका 23 वर्षीय युवतीच्या होणाऱ्या पतीला खोटे संदेश पाठवून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी सागर अनिल पांडे (वय 27) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवती नियमितपणे प्रशिक्षणासाठी मैदानावर जात होती. त्या ठिकाणी सागर पांडे याच्याशी तिची ओळख झाली होती. सुरुवातीला मैत्रीच्या नात्याने दोघांमध्ये संवाद होत होता. मात्र, सागरने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याने युवतीने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.
या त्रासाला कंटाळून युवतीने सरावासाठी जाणे बंद केले. दरम्यान, एप्रिल 2026 मध्ये तिचे लग्न जवळच्या जिल्ह्यातील युवकासोबत ठरले आणि साखरपुडाही पार पडला. मात्र, सागर पांडे याने युवतीच्या होणाऱ्या पतीचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याच्याशी संपर्क साधला. त्याने दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचा खोटा दावा करत संदेश पाठवले, ज्यामुळे युवतीची बदनामी झाली आणि लग्न मोडले.
तसेच, युवती रस्त्याने जात असताना सागरने तिला अडवून हात पकडत प्रेम प्रस्ताव दिला. फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोपही तिने तक्रारीत केला आहे.
या तक्रारीच्या आधारे राजापेठ पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी