
वॉशिंग्टन , 30 एप्रिल (हिं.स.) पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात मुख्य मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अलीकडील घडामोडींमुळे इस्लामाबादवर वॉशिंग्टनला फसवण्याचे आरोप होत आहेत.हे आरोप यासाठी होत आहेत की पाकिस्तानने इराणला रशिया, चीन आणि इतर देशांशी व्यापार करण्यासाठी जमिनीमार्गे सहा मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. हे सर्व त्या वेळी घडत आहे, जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ मोठमोठ्या घोषणा करत म्हणत आहेत की पाकिस्तानने इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेला यशस्वी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ डेरेक जे. ग्रॉसमन यांनी इशारा दिला आहे की, इराणला हे भूपरिवहन मार्ग उपलब्ध करून देऊन पाकिस्तान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या “कमाल आर्थिक दबाव धोरणाला कमकुवत करत आहे. यामुळे तेहरानला आपल्या बंदरांवर असलेल्या अमेरिकन नाकेबंदीला चुकवून तेल व्यापार अखंडपणे सुरू ठेवणे शक्य होणार आहे.
ग्रॉसमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले, “ट्रम्प प्रशासन, तुमच्यासमोर एक समस्या आहे. तुमचा जवळचा मित्र पाकिस्तान, असे दिसते की त्याने नुकतेच इराणसाठी जमिनीमार्गे सहा नवीन मार्ग खुले केले आहेत. यामुळे इराणला होर्मुज सामुद्रधुनी येथील नाकेबंदीला चुकवण्यात मदत होईल. इस्लामाबादने पुन्हा एकदा अमेरिकेसोबत दुहेरी खेळ खेळला आहे.”
तसे पाहिले तर मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिली वेळ नाही.इस्रायलने यापूर्वीच इस्लामाबादवर मध्यस्थी प्रक्रियेत अविश्वसनीय खेळाडू असल्याचा आरोप केला आहे.भारतातील इस्रायलचे राजदूत रूवेन अझार यांनी पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर शंका व्यक्त केली होती. इस्रायलसह इराणनेही पाकिस्तानच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इब्राहिम रेजाई, जे इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आयोगाचे प्रवक्ते आहेत, यांनी पाकिस्तानला इराणचा मित्र म्हटले असले तरी तो योग्य मध्यस्थ नाही असे स्पष्ट केले. त्यांच्या मते पाकिस्तानचा कल अमेरिकेच्या हितांकडे अधिक आहे.
इराणी बंदरांवर अमेरिकन नौदलाने लादलेल्या नाकेबंदीमुळे ट्रम्प प्रशासन तेहरानवर प्रचंड आर्थिक दबाव आणू इच्छित आहे, जेणेकरून इराण अमेरिकेच्या अटी मान्य करेल. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनाला दीर्घकालीन नाकेबंदीची तयारी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.अशा परिस्थितीत, इराणला जमिनीमार्गे सहा मार्ग उपलब्ध करून देत पाकिस्तानने अमेरिकेच्या धोरणात मोठी पोकळी निर्माण केली असल्याचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode