लातूर - जनगणना करण्यासाठी शिक्षकांना सुविधा देण्याची मागणी
लातूर, 30 एप्रिल (हिं.स.)।जनगणना कामासाठी नियुक्त शिक्षकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक समिती निलंगा यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले असून, त्याची प्रत जिल्हाधि
शिक्षक समिती


लातूर, 30 एप्रिल (हिं.स.)।जनगणना कामासाठी नियुक्त शिक्षकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक समिती निलंगा यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले असून, त्याची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात येणार असल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण सोळुंके यांनी सांगितले.

तहसीलदार कुलकर्णी यांनी संबंधित मागण्या शासनापर्यंत पोहोचवून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. जनगणना प्रक्रियेदरम्यान शिक्षकांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन विविध मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. समितीच्या प्रमुख मागण्यांमध्ये जनगणनेसाठी नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षकांना सुविधांयुक्त मोबाईल उपकरण उपलब्ध करून देणे, कामादरम्यान योग्य सुरक्षा व्यवस्था करणे, जनगणना कालावधीत विमा संरक्षण देणे यांचा समावेश आहे. तसेच सुट्टीच्या कालावधीइतकी अर्जित रजा मंजूर करणे, उन्हाळ्यातील कामासाठी वाहतूक भत्ता देणे, तसेच प्रशिक्षण सत्रे सकाळी ७ ते १२ या वेळेत घेण्यात यावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय शिक्षणसेवकांचा अकाली मृत्यू झाल्यास किमान २० लाख रुपयांचे अनुदान देण्याची मागणी समितीने केली आहे. या वेळी अरुण सोळुंके, संजय कदम, गणेश गायकवाड, संजय सूर्यवंशी, मुकुंद पाटील, वसंत पाटील, टी. एस. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande