भटक्या प्राण्यांकरिता निवारा उभारणीसाठी जागा शोधण्याचे निर्देश
मुंबई, 30 एप्रिल, (हिं.स.) : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा समिती अध्यक्ष सुभाष काकडे यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. प्राणी निवारा उ
भटक्या प्राण्यांकरिता निवारा उभारणीसाठी जागा शोधण्याचे निर्देश


मुंबई, 30 एप्रिल, (हिं.स.) : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा समिती अध्यक्ष सुभाष काकडे यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. प्राणी निवारा उभारणीसाठी योग्य जमिनीची सर्व संबंधित विभागानी संयुक्त पाहणी करून सर्वसमावेशक अहवाल प्राधान्याने सादर करण्याचे निर्देश समिती अध्यक्ष काकडे यांनी बैठकीत दिले.

बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. विजय तुकाराम सावंत, देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ कलीमपाशा पठाण, वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ वाय. डी. आगरकर, देवनार पशुवधगृहाचे पशुधन विकास अधिकारी डॉ प्रसाद घोलप, पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ.दामिनी खवसकर, कनिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ गणेश थोरात, पोलीस निरीक्षक विठ्ठल आर्डेकर, मुंबई (पूर्व) प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक अरविंद तोडकरी, बोरीवली प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक समाधान महानकर आदी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी मागील बैठकीच्या इतिवृत्तास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यानंतर प्राणी निवारा उभारणीसाठी जागा निश्चितीच्या मुद्यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भटक्या प्राण्यांसाठी निवारा उभारणीसाठी आवश्यक जमिनीच्या पाहणीसाठी यापूर्वी मार्गदर्शक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार मालाड येथील मालवणी परिसरातील जागेची तपशीलवार माहिती यावेळी देण्यात आली. तसेच चेंबूर (पूर्व) आणि मुलुंड (पूर्व) येथील पर्यायी जागांचा प्रस्तावही चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर बोरीवली तहसीलदारांशी समन्वय साधून मुंबई उपनगरात योग्य मोकळ्या जागेचा शोध घ्यावा आणि जमिनीची संयुक्त पाहणी करून तातडीने अहवाल सादर करावा, असे निर्देश अध्यक्ष काकडे यांनी यावेळी दिले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्राण्यांची सुरक्षित वाहतूक, पशुवधगृहाची वैधता, प्राण्यांची वैद्यकीय तपासणी आदी सर्व बाबी काटेकोर पद्धतीने तपासण्याचे निर्देशही काकडे यांनी यावेळी दिले. प्राणी कल्याणाशी संबंधित विविध विषयांवरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande