
नवी दिल्ली, 05 एप्रिल (हिं.स.)आम आदमी पार्टीने (आप) राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवल्यानंतर, राघव चड्ढा आणि पक्षाच्या नेत्यांमधील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. राघव चड्ढा सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून या आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. रविवारी, राघव चड्ढांनी पुन्हा एकदा त्यांच्या 'एक्स' अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ते सभागृहात पंजाबचे मुद्दे मांडताना दिसत आहेत.
'एक्स'वर व्हिडिओ शेअर करताना राघव चड्ढांनी लिहिले, माझ्या आम आदमी पार्टीच्या (आप) सहकाऱ्यांसाठी, ज्यांना 'राघव चड्ढा संसदेत पंजाबचे मुद्दे मांडण्यात अपयशी ठरले,' असा दावा करणारा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यास भाग पाडले गेले, त्यांच्यासाठी हा एक छोटा ट्रेलर आहे, खरे चित्र अजून बाकी आहे. पंजाब माझ्यासाठी केवळ चर्चेचा विषय नाही. हे माझे घर, माझे कर्तव्य, माझी माती, माझा आत्मा आहे.
राघव चड्ढा यांनी शनिवारी आपल्या पक्षाने केलेले आरोप खोटे आणि एका नियोजित मोहिमेचा भाग असल्याचे सांगत फेटाळून लावले. 'आप'चे खासदार म्हणाले की, ते संसदेत सामान्य माणसाचे प्रश्न मांडण्यासाठी जातात, गोंधळ घालण्यासाठी आणि माइक तोडण्यासाठी नाही.
एका व्हिडिओ संदेशात चड्ढा म्हणाले, मी विरोधी पक्षाच्या सभात्यागात सहभागी होण्यास कधीही नकार दिलेला नाही आणि असे आरोप धादांत खोटे आहेत. मी माझ्या टीकाकारांना आव्हान देतो की, मी विरोधी पक्षाच्या सभात्यागात सहभागी झालो नाही, असे एकही उदाहरण दाखवा. संसदेचे संपूर्ण कामकाज सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड होते.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील महाभियोग प्रस्तावावर त्यांनी स्वाक्षरी केली नाही, या आरोपाबाबत चड्ढा म्हणाले, या संदर्भात कोणत्याही पक्षनेत्याने माझ्याशी औपचारिक किंवा अनौपचारिकरित्या संपर्क साधलेला नाही. माझे लक्ष संसदेत जीएसटी, आयकर, दिल्लीचे प्रदूषण, पंजाबमधील पाणीटंचाई, शिक्षण, आरोग्य, रेल्वे प्रवाशांच्या समस्या, मासिक पाळीचे आरोग्य, बेरोजगारी आणि महागाई यांसारखे जनहिताचे प्रश्न मांडण्यावर केंद्रित आहे. मी संसदेत सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मांडायला जातो, गोंधळ घालून माइक तोडायला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे