
इस्लामाबाद, 07 एप्रिल (हिं.स.)।इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीवर बंदी घातल्यापासून दक्षिण आशिया आणि युरोपीय देशांमध्ये पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारत, नेपाळ आणि बांग्लादेशसारख्या देशांनी या संकटावर मात करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली असली तरी पाकिस्तानला मात्र या परिस्थितीचा मोठा फटका बसला असून तेथे स्मार्ट लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत याची घोषणा केली.
पाकिस्तान रेडिओच्या वृत्तानुसार, शहबाज सरकारने पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान, इस्लामाबाद राजधानी क्षेत्र, गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओके (पाकव्याप्त काश्मीर) येथे बाजारपेठा, शॉपिंग मॉल आणि व्यावसायिक आस्थापने रात्री ८ वाजता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्लामाबाद येथे शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पेट्रोलियम उत्पादनांची बचत आणि ऊर्जा वापर कमीत कमी करण्यावर विशेष भर देण्यात आला.
प्रांतीय सरकारांच्या सल्ल्यानुसार, खैबर पख्तूनख्वातील विभागीय मुख्यालयांमधील बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र सर्व जनरल स्टोअर्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि सर्व प्रकारचे मॉल रात्री ८ वाजता बंद करण्यात येणार आहेत. याशिवाय बेकरी, रेस्टॉरंट्स, खाद्यपदार्थांची दुकाने, मॅरेज हॉल, टेंट हाऊस आणि विवाह तसेच इतर समारंभ आयोजित होणारी व्यावसायिक ठिकाणे रात्री १० नंतर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासगी मालमत्ता आणि घरांमध्ये रात्री १० नंतर विवाह सोहळे आयोजित करण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मात्र या निर्बंधांमधून मेडिकल स्टोअर्स आणि फार्मसींना सूट देण्यात आली आहे. हे निर्बंध मंगळवारपासून म्हणजेच आज रात्री ८ वाजल्यापासून लागू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गिलगिट आणि मुजफ्फराबाद शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा एक महिन्यासाठी मोफत ठेवण्याची घोषणा केली असून त्याचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. या बैठकीला उपपंतप्रधान इशाक डार, नियोजन व विकास मंत्री एहसान इकबाल तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode