स्मशानभूमीबाबत आमची कोणतीही हरकत नाही; महापालिका घेईल जो निर्णय घेईल तो मान्य – धर्मराज काडादी
सोलापूर, 08 एप्रिल (हिं.स.)। शहरातील शांती चौक येथील स्मशानभूमीच्या जागेबाबत सुरू असलेल्या वादावर अखेर श्री सिद्धेश्वर देवस्थानने स्पष्ट भूमिका मांडत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. सदर जागा महापालिकेने होटगी मठाला किंवा इतर कोणत्याही संस्थे
Bcg


सोलापूर, 08 एप्रिल (हिं.स.)।

शहरातील शांती चौक येथील स्मशानभूमीच्या जागेबाबत सुरू असलेल्या वादावर अखेर श्री सिद्धेश्वर देवस्थानने स्पष्ट भूमिका मांडत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. सदर जागा महापालिकेने होटगी मठाला किंवा इतर कोणत्याही संस्थेला दिल्यास त्याबाबत देवस्थानची कोणतीही हरकत नसल्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी जाहीर केले.

प्रसिद्धीपत्रकात त्यांनी स्पष्ट केले की, श्री सिद्धेश्वर देवस्थानने कधीही या जागेची मागणी महापालिकेकडे केलेली नाही. मात्र, महापालिका निवडणुकीपूर्वी प्रशासनाच्या कार्यकाळात, लिंगायत समाजासाठी स्मशानभूमीचे व्यवस्थापन देण्याच्या दृष्टीने देवस्थानच्या अनुभवाचा विचार करून त्यांना सहकार्य करण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला होता.

या संदर्भात देवस्थानच्या बैठकीत चर्चा होऊन सहकार्याची तयारी दर्शविण्यात आली आणि त्यानुसार महापालिकेला होकारार्थी कळविण्यात आले होते. त्या काळात संबंधित जागा देवस्थानकडे देण्याबाबत ठरावही करण्यात आला होता. मात्र, निवडणुकीनंतर प्रत्यक्ष ताबा घेण्याबाबत कोणतीही पुढील कार्यवाही झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीनंतर या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य करत काडादी यांनी काही मंडळींवर टीका केली. लिंगायत समाजात तसेच विविध संस्था आणि व्यक्तींमध्ये मतभेद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या काही वर्षांपासून देवस्थानविरोधात खालच्या पातळीचे राजकारण सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महत्त्वाचे म्हणजे, संबंधित जागेबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णतः महानगरपालिकेकडे असून, कोणताही निर्णय घेतल्यास देवस्थान त्यास विरोध करणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.या खुलाशामुळे शांती चौक स्मशानभूमीच्या जागेबाबत सुरू असलेल्या चर्चांना दिशा मिळाली असून, अनावश्यक वादांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande