सिंबायोसिस येथे आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जागतिक शिक्षण क्षेत्रातील दिग्गज एकत्र येणार
पुणे, 08 एप्रिल (हिं.स.)। सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे व असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने दिनांक ९ ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान विद्यापीठाच्या लवळे कॅम्पस येथे उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणावरील (IHE)वार्षिक परिषद
सिंबायोसिस येथे आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जागतिक शिक्षण क्षेत्रातील दिग्गज एकत्र येणार


पुणे, 08 एप्रिल (हिं.स.)। सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे व असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने दिनांक ९ ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान विद्यापीठाच्या लवळे कॅम्पस येथे उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणावरील (IHE)वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थित्यंतरातील आंतरराष्ट्रीय शिक्षण: पद्धती,धोरणे आणि दृष्टिकोन (“Transnational Education in Transition: Practices, Policies and Perspectives,”)या संकल्पनेवर आधारित या परिषदेत शैक्षणिक क्षेत्र,सरकार आणि जागतिक संस्थांमधील नामवंत व्यक्ती आंतरराष्ट्रीय उच्चशिक्षणाच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणार आहेत.

या परिषदेचा उद्घाटन सोहळा दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता संपन्न होईल. या सत्रात महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक आणि धोरण विभागाचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे व ऑस्ट्रेलियाच्या डीकिन विद्यापीठाचे कुलगुरू आणि अध्यक्ष प्रा. इयान मार्टिन यांची प्रमुख उपस्थिती असेल. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब.मुजुमदार भूषवतील. तसेच असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. विनय पाठक,सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर,कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण आणि शिक्षण विद्याशाखेच्या अधिष्ठाता व परिषदेच्या आयोजक सचिव डॉ. नीता इनामदार आदी इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही वर्षांत ही परिषद उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणावरील संवादासाठी एक महत्त्वाचे जागतिक व्यासपीठ म्हणून उदयास आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या संदर्भात यावर्षीच्या परिषदेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे,कारण, हे धोरण भारताला जागतिक शिक्षण केंद्र बनवण्याचे आणि सीमापार शैक्षणिक सहकार्य व संस्थात्मक गतिशीलतेस प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवते.

याविषयी बोलताना सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या च्या प्र-कुलपती व सिंबायोसिस च्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर म्हणाल्या, भारतीय विद्यापीठांचे नेतृत्व,कुलगुरू आणि प्राध्यापक,परदेशी विद्यापीठांच्या भारतात स्थापन होणाऱ्या कॅम्पसच्या परिणामांचा बारकाईने विचार करत आहेत. आपण याकडे आव्हान म्हणून पाहतो की संधी हा या टप्प्यावर विचार करण्याजोगा प्रश्न आहे. यावर्षीची परिषद अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करेल. भारतीय संस्थांनी परदेशात आपले कॅम्पस कसे उभारले आहेत,याचाही शोध घेण्यात येईल. जेव्हा उच्च शिक्षण संस्था सीमा ओलांडतात,तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो?आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा व्यक्ती (विद्यार्थी आणि शिक्षक),संस्था आणि संपूर्ण व्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांवर या परिषदेत चर्चा करण्यात येईल. धोरणकर्ते,संस्थात्मक नेते आणि जगभरातील विद्वानांना एकत्र आणून,ही परिषद धोरणात्मक विचारात योगदान देणे,आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे आणि जागतिक उच्च शिक्षण परिसंस्थेतील भारताचे वाढते स्थान अधिक मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande