
सोलापूर, 09 एप्रिल, (हिं.स.)। सोलापूरच्या “पुरुष पण भारी देवा” या माहितीपटाने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली छाप उमटवत शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. नुकत्याच मुंबई येथे पारंबी प्रोडक्शन आयोजित चौथ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या माहितीपटाला Special Mention (Documentary) हा सन्मान मिळाला आहे.
या महोत्सवात देश-विदेशातील तब्बल १२२ लघुपटांचा सहभाग होता. प्राथमिक फेरीचे परीक्षण कल्पेश राणे यांनी केले, तर अंतिम फेरीचे परीक्षण सुप्रसिद्ध कास्टिंग दिग्दर्शक व चित्रपट दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांनी केले. तसेच “आता थांबायचं नाय” या चित्रपटातील अभिनेते किशोर बच्चाव यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.“पुरुष पण भारी देवा” या माहितीपटामध्ये आयुष्यातील विविध परिस्थितींमध्ये कणखर राहणाऱ्या पुरुषाच्या जीवनातील संघर्ष, जबाबदाऱ्या आणि त्याच्या मनातील भावना व संवेदनशीलता प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. कुटुंबासाठी झटणाऱ्या पुरुषाची सामाजिक भूमिका अधोरेखित करतानाच स्त्री-पुरुष समानतेचा संदेशही या माहितीपटातून देण्यात आला आहे.या माहितीपटाची संकल्पना, लेखन व निर्मिती ऋत्विज चव्हाण यांनी केली असून दिग्दर्शन सचिन जगताप यांनी केले आहे. निवेदन व संहिता पुनर्लेखन श्रुती कुलकर्णी-पात्रुडकर यांनी केले आहे. छायाचित्रण संदीप चौहान व निरंजन राऊळ यांनी केले असून AI व्हिडीओ व इफेक्ट्स प्रमोद बंडीवार यांनी साकारले आहेत.यापूर्वीही या माहितीपटाने वाराणसी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दोन पुरस्कार मिळवले असून, इंडियन सिनेमा फेस्टिवल (बंगळुरू), इंटरनॅशनल आर्ट फिल्म फेस्टिवल, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि नवरंग नॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘बेस्ट डॉक्युमेंटरी’सह अनेक सन्मान प्राप्त केले आहेत.या यशाचे श्रेय संपूर्ण टीमच्या मेहनतीला असून वेगळ्या विषयामुळे हा माहितीपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे निर्माते ऋत्विज चव्हाण यांनी सांगितले. लवकरच हा माहितीपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड