
पालघर, 01 मे (हिं.स.) : घोडबंदर परिसरात पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांच्या वाहनाचा शुक्रवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी सुदैवाने खासदार सावरा सुखरूप बचावले. त्यांच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर तात्काळ प्राथमिक उपचार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार सावरा हे १ मे रोजीच्या नियोजित कार्यक्रमासाठी निघाले होते. वेळेचे नियोजन साधण्यासाठी त्यांनी आपले वाहन मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या लेनवर उलट दिशेने वळवले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या डंपरशी त्यांच्या वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडकेनंतर वाहनातील सर्व एअरबॅग्स उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि गाडीत असलेले सर्वजण सुरक्षित राहिले. अपघातानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, या घटनेमुळे वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, राँग साईडने वाहन चालवण्याचे गंभीर धोके समोर आले आहेत.
---------------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL