जनगणना स्वगणनेच्या टप्प्यास प्रारंभ प्रगणकांना योग्य व अचूक माहिती द्या - पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर, 01 मे (हिं.स.)। जनगणना २०२७ च्या पहिल्या म्हणजेच स्वगणनेच्या टप्प्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. दि.१ ते १५ मे पर्यंत ही स्वगणना होणार आहे. त्यानंतर प्रगणक घरोघरी जाऊन माहिती नोंदवतील.प्रत्येक नागरिकांने आपल्या घरी य
Q


छत्रपती संभाजीनगर, 01 मे (हिं.स.)।

जनगणना २०२७ च्या पहिल्या म्हणजेच स्वगणनेच्या टप्प्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. दि.१ ते १५ मे पर्यंत ही स्वगणना होणार आहे. त्यानंतर प्रगणक घरोघरी जाऊन माहिती नोंदवतील.प्रत्येक नागरिकांने आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना योग्य व अचूक माहिती द्यावी. जनगणनेतील सहभाग हे आपले कर्तव्य आहे,अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले.

महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यानंतर पालकमंत्री श्री. शिरसाट यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रचे विशेष महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, होऊ घातलेली जनगणना-२०२७, ही आपल्या देशाची १६ वी आणि पहिली डिजिटल जनगणना असून मोबाईल अॅप व ऑनलाइन पद्धतीने माहिती घेतली जाणार आहे.

त्याचा पहिला टप्पा स्व-गणना (Self Enumeration) म्हणजे जनगणनेसाठी स्वतःच्या कुटूंबाची माहिती स्वतः नोंदविणे. आजपासून सुरु होत आहे. ही प्रक्रिया दि. १ मे ते दि. १५ मे २०२६ या कालावधीत पार पाडली जाणार आहे. यात आपण आपली व आपल्या कुटुंबाची अचूक माहिती नोंदवण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी. त्यासाठी जनगणना संचालनालयाने https://se.census.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ तयार केले आहे.

स्व-गणनेचे टप्पे

१.संकेतस्थळावर लॉग-इन करा.आपले राज्य व आवश्यक माहिती भरा.२.कुटूंब प्रमुखाचा मोबाईल क्रमांक व E mail ID नोंदवा. ३. आपल्या सोयीची भाषा निवडा आणि मोबाईलवर आलेला OTP नमूद करा.४.स्थानाबाबत (जिल्हा, तालुका, शहर व स्थानिक) माहिती अचूक भरा.५. नकाशावर आपल्या घराचे अचूक स्थान मार्क करा. ६. प्रश्नावली भरा. कुटूंब प्रमुख व कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती व्यवस्थित भरा.७. Preview भरलेली माहिती पुन्हा तपासा आणि आवश्यकता भासल्यास दुरुस्ती करा. ८. Final Submit करा.

यानंतरच्या टप्प्यात दि. १६ मे नंतर जनगणना प्रगणक आपल्या घरी भेट देऊन माहितीची पडताळणी करतील. त्यांना अचूक माहितीसाठी सहकार्य करा.

संपूर्ण माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला SE ID (Self Enumeration ID) मिळेल. हा SE ID तुम्हाला *SMS व ई-मेलद्वारे प्राप्त होईल. SE ID आपल्याकडे जतन करून ठेवावा.

पालकमंत्री शिरसाट यांनी आवाहन केले की, नागरिकांनी आपली माहिती अचूक व सत्य सांगावी. नोंदणीनंतर मोबाईल नंबर बदलता येणार नाही. याची खबरदारी घ्यावी. माहिती भरतांना प्रत्येक कुटुंबासाठी वेगळा मोबाईल नंबर वापरा. यानंतर दि.१६ मे ते १४ जुन २०२६ घरांची माहिती (घर नोंदणी आणि निवास माहिती (House Listing) टप्पा), आणि फेब्रुवारी-२०२७ मध्ये लोकसंख्या मोजणी.

५३१७ प्रगणक , ७३९ सुपरवायझर

आपल्या जिल्ह्यात प्रशासनाने जनगणनेची जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यात ५३१७ प्रगणक व ७३९ सुपरवायझर नेमण्यात आले आहेत. त्यांचे प्रशिक्षणही झाले आहे. प्रधान जनगणना अधिकारी हे स्वतः जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त असतील. या शिवाय अति/ उपजिल्हा जनगणना अधिकारी अधिकाऱ्यांच्या, उपविभागीय जनगणना अधिकारी, शहर जनगणना अधिकारी, उपशहर जनगणना अधिकारी , प्रभाग, चार्ज जनगणना अधिकारी यांच्याही नेमणूका करण्यात आल्या आहेत. एका प्रगणकाला ७०० ते ८०० लोकसंख्येचे काम करायचे असते. प्रत्येक सहा प्रगणकांमागे एक असे पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, जनगणना ही विकासाचा पाया आहे. शासनाच्या योजना, निधी वाटप आणि धोरणे ही याच माहितीवर ठरतात. जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून ती देशाच्या विकासाचा पाया आहे. शासनाच्या योजना, निधी वाटप, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा या सर्व गोष्टींचे नियोजन जनगणनेच्या अचूक माहितीवर आधारित असते. नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या जनगणना अधिकाऱ्यांना योग्य आणि अचूक माहिती द्यावी. ही आपली जबाबदारी आहे. आपण दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande