
रायगड, 01 मे (हिं.स.) : कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ग्रा.मा. १४८ मौजे जुम्मापट्टी ते बेकरेवाडी या रस्ते प्रकल्पासाठी आवश्यक वनजमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला गती मिळणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुम्मापट्टी ते बेकरेवाडी या मार्गासाठी एकूण ०.५०५८ हेक्टर आर वनक्षेत्र वापरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सदर वनक्षेत्र हे वापरकर्ता अभिकरण म्हणून उप अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांच्या ताब्यात अधिकृतरित्या हस्तांतरित करण्यात आले आहे. अनुसूचित जमाती व अन्य पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६ तसेच सुधारित नियम २०१२ अंतर्गत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.
या रस्त्यामुळे जुम्मापट्टी, बेकरेवाडी तसेच परिसरातील दुर्गम वाडी-वस्त्यांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः पावसाळ्यात खराब रस्त्यांमुळे नागरिकांना वाहतूक, आरोग्य सेवा, शिक्षण तसेच बाजारपेठेत जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गावांचा संपर्क अधिक सुकर होणार असून विकासकामांनाही चालना मिळणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, वन विभाग तसेच स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)