
लातूर, 01 मे (हिं.स.) उदगीर नगर परिषद हद्दीतील बालाजी मंदिर परिसरातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ४० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे. या निधीमुळे परिसराचा सर्वांगीण विकास होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शहातील बालाजी मंदिर परिसर हा धार्मिक तसेच सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा भाग असून येथे दररोज मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ असते. मात्र, पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाकडे पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला आहे.
या निधीतून मंदिर परिसरात सामाजिक सभागृह, संरक्षण भिंत, जाॅगिंग ट्रॅक व उद्यान विकसित करणे, मंदिर परिसरात लोकसेवा केंद्र बांधकाम करणे यासाठी सदर निधीचा उपयोग केला जाणार आहे.
या कामांमुळे मंदिर परिसर अधिक सुशोभिकरण व सुविधायुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार संजय बनसोडे यांचे आभार मानले आहेत. तसेच ही कामे लवकरात लवकर पूर्ण करुन शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, उदगीर शहराच्या विकासासाठी भविष्यातही विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक निधी आणण्याचा प्रयत्न सुरू राहील, असे आश्वासन आ. बनसोडे यांनी दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis