
लातूर, 01 मे (हिं.स.)
रस्ते अपघातांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देवणी पोलिसांनी हेल्मेट वापरण्याबाबत नागरिकांना सक्त सूचना देत जनजागृती मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत लसोना चौकात विशेष बॅनर लावून तसेच अपघातग्रस्त दुचाकी प्रदर्शित करून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. देवणी पोलिसांची ही जनजागृती मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असून, अपघातमुक्त परिसर निर्माण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
देवणी पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित या उपक्रमाचा उद्देश वाहनचालकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. चौकात ठेवण्यात आलेली अपघातग्रस्त बाईक पाहून अनेक नागरिकांनी थांबून माहिती घेतली आणि
हेल्मेटच्या महत्त्वाची जाणीव करून घेतली. हेल्मेट वापरा, जीव वाचवा असा संदेश देणारे बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. पोलिसांनी सांगितले की, बहुतांश अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवितहानी होते. हेल्मेटचा वापर केल्यास अशा अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis