
रायगड, 01 मे (हिं.स.)। : राज्यातील निवडणुकांचे मतदान संपताच केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केल्याने व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना नितीन विश्वनाथ सावंत, माजी सदस्य, वन संवर्धन समिती, माथेरान यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
“१ मे महाराष्ट्र दिनी सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ केली. राज्यातील निवडणुकांचे मतदान संपताच ही दरवाढ करण्यात आली. त्यामुळे रायगड जिल्यातील दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकांना वापरावा लागणारा एक व्यावसायिक गॅस सिलेंडर आता जवळपास ३ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे,” असे सावंत यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्यावरही निशाणा साधला. “अगोदर २० रुपये गॅस दरवाढ झाली तरी गॅस सिलेंडरवर बसून आंदोलन करणाऱ्या स्मृती इराणी आता कुठे विस्मृतीत गेल्या?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेला दरवाढीच्या भरभरून शुभेच्छाच मिळाल्या आहेत,” असा उपरोधिक टोला देखील त्यांनी लगावला. सततच्या वाढत्या महागाईमुळे व्यापारी, हॉटेल चालक व लघुउद्योजक आधीच आर्थिक अडचणीत असताना या नव्या दरवाढीमुळे त्यांच्यावरील आर्थिक ताण अधिक वाढणार असल्याची भावना व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.
शेवटी “जय महाराष्ट्र!” असा संदेश देत नितीन सावंत यांनी सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरची दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)