
छत्रपती संभाजीनगर, 01 मे (हिं.स.)। खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असुन, पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्जाचे वितरण करुन उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी दिले
जिल्हाधिकारी कार्यालीयातील नियोजन भवन येथे खरीप हंगाम पूर्व नियोजन 2026-27 बैठक पालकमंत्री श्रीमती मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार सर्वश्री बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, संतोष दानवे, हिकमत उढाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, काही दिवसात मान्सून सक्रिय होणार असून खरीप हंगामाचे कामे सुरु होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खते, बियाणे यांची मुबलक उपलब्धता ठेवून शेतकऱ्यांसाठी अतिशय सूक्ष्म नियोजन करावे. तसेच बोगस बियाणे विक्री होणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे. खरीप हंगाम 2026-27 मध्ये जिल्ह्याला 1 लाख 6 हजार शेतकऱ्यांना 1303 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र आजअखेर फक्त 49 कोटी रुपयांचेच पीक कर्ज वितरित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज केलेल्या कर्ज प्रकरणांना त्वरीत मंजुरी देऊन निधी वितरित करावा. कोणताही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व बँकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी दिले.
शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकावर अवलंबून न राहता फळबाग लागवड, भाजीपाला,बिजउत्पादन अशा पिकांना प्राधान्य द्यावे. विशेषत: कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पिकांना प्राधान्य शेतकऱ्यांनी द्यावे. यासाठी कृषि विभागाने शेतकऱ्यामध्ये जनजागृती करावी. तसेच शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी व ॲग्रीस्टकची नोंदणी करणे बंधनकारक असून शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.
जिल्ह्यात 6 लाख 47 हजार 307 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्याचे नियोजन असून त्यापैकी 33 टक्के क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेतले जाणार आहे. सोयाबीनसाठी 1 लाख 62 हजार 162 क्विंटल बियाण्याची आवश्यकता असुन खुल्या बाजारात जवळपास 60 हजार क्विंटल बियाणे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ व इतर खाजगी कंपन्या यांच्याकडून उपलब्ध होईल. तसेच उर्वरित 1 लाख क्विंटल बियाणे शेतकरी घरचे बियाणे वापरत असल्याने बियाण्याची उपलब्धता समाधानकारक आहे. तसेच कापूस हे प्रथम क्रमांकाचे मुख्य पीक असून 45 टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होणार आहे. त्यासाठी 11 लाख 2 हजार बियाणे पाकिटांची आवश्यकता असून दरवर्षी प्रमाणे चालू हंगामासाठी 13 लाख पेक्षा जास्त कापूस बियाणे पाकिटे उपलब्ध होणार आहेत. तूर, मुग, उडीद, मका, ज्वारी आदी पिकांची लागवड 1 लाख 43 हजार 231 हेक्टर क्षेत्रावर होणार असून त्यासाठीही बियाण्याचा पुरेसा साठा असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी दिली.
खरीप हंगामासाठी 2 लाख 2 हजार मेट्रिक टन खताचा वापर होतो. खरीप हंगामासाठी 2 लाख 43 हजार 500 मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाले आहे. सध्या 1 लाख 24 हजार 932 मेट्रिक टन खत साठा जिल्ह्यात उपलब्ध असून, टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी जमीन आरोग्य पत्रिकेचा वापर करून संतुलित खत मात्रा वापरावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
खरीप हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा भरारी पथक, जिल्हा तक्रार निवारण कक्ष तसेच तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात व पंचायत समिती स्तरावर प्रत्येकी एक तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. याशिवाय, अतिवृष्टी, गारपीट, वादळ यामुळे जिल्ह्यात 4 लाख 64 हजार 357 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, 6 लाख 26 हजार 926 शेतकऱ्यांना एकूण 437 कोटी 39 लाख रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात आली.
यावेळी बैठकीत पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते पिक स्पर्धा योजनामध्ये विविध पिकाच्या उत्पादनात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis