
पुणे, 01 मे (हिं.स.)। सिंहगड किल्ला परिसरातील तूपखाना परिसरात बुरुजावरुन उडी मारुन एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय तरुणी चिंचवड परिसरातील बिजलीनगर भागात राहायला आहे. ती मूळची नांदेडची रहिवासी आहे. तरुणी २८ एप्रिल रोजी घरातून बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार पोलिसांकडे दिली होती. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना याबाबतची माहिती देण्यात आली. तांत्रिक तपासात तरुणी सिंहगड किल्ला परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हवेली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, सहायक फौजदार गिरे, प्रवीण ताकवणे आणि पथकाने तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी शोधमोहिमेत गिर्यारोहकांच्या पथकाची मदत घेतली. मध्यरात्रीपर्यंत तरुणीचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पुन्हा शोधमोहीम राबविली. तरुणीने सिंहगड किल्ला परिसरातील तूपखान्याजवळील बुरुजावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु