
ठाणे, 01 मे (हिं.स.) : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यातील स्व-गणना (Self-Enumeration) प्रकियेचा शुभारंभ आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आला. यावेळी स्वगणना करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या क्यू आर कोडचे उद्घाटन करण्यात आले. जनगणना ही महत्वाची असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने क्यूआर कोडच्या माध्यमातून स्वगणना करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केली.
यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ शानू पठाण, स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, नगरसेविका काजल गुणीजन, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मधूकर बोडके, डॉ. मिताली संचेती, दिपक झिंजाड, जितेंद्र निकम, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, सहायक आयुक्त सचिन बोरसे, जनगणना निर्देशालयचे सहसंचालक रमेश भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वगणना केल्याबद्दल जनगणना निर्देशालयचे सहसंचालक रमेश भोसले यांनी त्यांना सन्मानचिन्ह प्रदान केले. यावेळी महापालिकेने जनगणनेची जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईटचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री यांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून स्वत: स्वगणना केली व उपस्थितानांही याबाबत आवाहन केले.
जनगणनेबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारने मॅसकोट तयार केले असून प्रतिकात्मक स्त्री व पुरूष यांचे कटआऊट तयार करुन त्यांना विकास व प्रगती अशी नावे दिली आहे. घरोघरी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करुन आपली अचूक माहिती द्यावी, ती माहिती गोपनीय ठेवली जाणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले
आपले सरकार राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा विकास आणि कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. हे साध्य करण्यासाठी, विश्वसनीय आणि अचूक आकडेवारी हेच आपले सर्वात प्रभावी साधन आहे. आपणास माहीतच आहे की, जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील स्व-गणना (Self-Enumeration) प्रकियेचा आज दि. १ मे २०२६ पासून अधिकृतपणे सुरू झाली असून ती दि १५ मे, २०२६ पर्यंत सक्रिय राहणार आहे, याबाबत ठाणे महापालिकेच्या मुख्यालय स्तरावर मदत कक्षाची निर्मिती करण्यात आली असल्याचे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर