
नाशिक, 12 मे (हिं.स.) :अवघ्या 8 वर्षांच्या नाशिकच्या वल्लभ चव्हाणने बुद्धिबळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत 1628 फिडे (FIDE) मानांकन मिळवले आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने देशातील अंडर-8 वयोगटात पाचवा क्रमांक पटकावला आहे.
वल्लभ हा नाशिक येथील विद्या प्रबोधिनी प्राथमिक विद्यालयात इयत्ता दुसरीत शिक्षण घेत आहे. लहान वयातच त्याने बुद्धिबळात विशेष प्रावीण्य मिळवत राज्यासह राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे.
वल्लभच्या यशामागे त्याची आई दीपश्री चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. मुलाच्या बुद्धिबळ कारकिर्दीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांनी आपल्या उच्च पदावरील नोकरीचा राजीनामा दिला. त्यामुळे वल्लभला देश-विदेशातील विविध बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.
वल्लभला फिडे राष्ट्रीय प्रशिक्षक, सीनियर नॅशनल आर्बिटर तसेच रीव्होलूशनरी चेस क्लबचे संस्थापक वरद देव यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या देखरेखीखाली वल्लभ दररोज 6 ते 8 तास शिस्तबद्ध सराव करतो.
नाशिकचा पुढील ग्रँडमास्टर बनण्याचे वल्लभचे स्वप्न असून, त्यासाठी तो सातत्याने मेहनत घेत आहे. त्याच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV