
नवी दिल्ली , 13 मे (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताफ्याचा आकार मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. त्यांच्या अलीकडील देशांतर्गत दौऱ्यादरम्यान हा निर्णय अमलात आणण्यात आला. ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यात आली असली, तरी एसपीजी प्रोटोकॉलनुसार आवश्यक सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे. हैदराबादमधील भाषणानंतर गुजरात आणि आसाममध्येही त्यांच्या ताफ्याचा आकार कमी करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी शक्य असेल तिथे त्यांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याचे निर्देशही दिले आहेत. मात्र, त्यासाठी नवीन वाहने खरेदी करू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. खर्चकपातीची ही मोहीम आता भाजपशासित राज्यांमध्येही दिसून येत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह इतर नेत्यांनीही आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय पंतप्रधान मोदी यांच्या त्या व्यापक आवाहनाचा भाग मानला जात आहे, ज्यामध्ये त्यांनी अनावश्यक प्रवास टाळण्यावर आणि राष्ट्रीय संसाधनांची बचत करण्यावर भर दिला होता. इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर आणि जागतिक कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांनी रविवारी देशवासीयांना जागतिक आर्थिक अनिश्चितता, पुरवठा साखळीतील अडथळे आणि महागाईच्या दबावाला सामोरे जाण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते.
पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना राष्ट्रहितासाठी जबाबदार जीवनशैली स्वीकारण्याचे आणि स्थानिक उत्पादनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. “आपण प्रत्येक गोष्टीसाठी आयातीवर अवलंबून राहिलो, तर देश पुढे कसा जाईल?” असा सवाल त्यांनी केला.
तसेच, परकीय चलनाची बचत करण्यासाठी नागरिकांनी एक वर्षभर सोन्याची अनावश्यक खरेदी टाळावी आणि परदेश प्रवासही शक्यतो टाळावा, असा सल्ला त्यांनी दिला. परकीय चलनसाठ्याची बचत करणे हे देशभक्तीचे कार्य असल्याचे सांगत त्यांनी परदेशातील सुट्ट्या आणि डेस्टिनेशन वेडिंग टाळण्याचे आवाहन केले. देशांतर्गत पर्यटन आणि देशातच समारंभ आयोजित करण्यावर भर देण्याचेही त्यांनी नागरिकांना सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode