
नाशिक, १३ मे (हिं.स.) : भोंदूगिरी, महिला अत्याचार, फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्याप्रकरणी आरोपी अशोक खरात याच्याविरोधात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत एकूण १७ गुन्हे दाखल असून, त्यापैकी ११ गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथक (SIT) मार्फत सुरू आहे. तपासादरम्यान आरोपीविरोधात मौखिक, भौतिक, दस्तऐवजी, परिस्थितीजन्य तसेच इलेक्ट्रॉनिक पुरावे प्राप्त झाले असून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार गुन्हा क्रमांक ७३/२०२६ चा तपास एसआयटीमार्फत करण्यात येत आहे. २० मार्च २०२६ पासून या प्रकरणासह एकूण ११ गुन्ह्यांचा तपास विशेष पथकाकडे सोपविण्यात आला आहे. या पथकात दोन पोलीस उपअधीक्षक, तीन पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहा पोलीस उपनिरीक्षक आणि सहा पोलीस अंमलदार अशा २४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी ईशानेश्वर मंदिर परिसरात अंधारात हातचलाखी करून स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवत होता. श्रद्धाळू आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत तो खडे, चिंचुके, रुद्राक्ष, पूजा आणि विविध विधींच्या माध्यमातून पैसे उकळत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मृत्यू तसेच बदनामीची भीती दाखवून आरोपीने लैंगिक शोषण केल्याचेही तपासातून स्पष्ट झाले आहे. दाखल झालेल्या १७ गुन्ह्यांपैकी ८ गुन्हे महिला लैंगिक अत्याचाराशी संबंधित असून उर्वरित गुन्हे फसवणूक, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, सावकारी अधिनियम २०१४ आणि इतर प्रकारांशी संबंधित आहेत.
एसआयटीकडून आतापर्यंत १०५ हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. महिलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये बीएनएसएस कलम ९३ नुसार ६० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक असल्याने तपासाला गती देण्यात आली आहे. आरोपीविरोधात पहिला गुन्हा १७ मार्च २०२६ रोजी दाखल झाला होता. त्यानंतर अवघ्या आठवडाभरात आणखी सात गुन्हे नोंदविण्यात आले.
दरम्यान, एसआयटीने सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या पीडितांच्या १३ हजार १७५ आक्षेपार्ह व्हिडिओ लिंक हटवल्या असून ४५१ सोशल मीडिया खाती कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहेत. या संदर्भात दोन स्वतंत्र गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
आरोपी अशोककुमार एकनाथ खरात याला ४९ दिवस एसआयटी कोठडीत ठेवण्यात आले होते. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून, काही गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक पुरावे मिळाल्यास पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV