
सोलापूर, 17 मे (हिं.स.)।
यंदाच्या उन्हाळ्यात सोलापुरातील तापमानाने धोकादायक पातळी गाठण्यास सुरुवात केली असून, रविवारी (१७ मे) शहरात तब्बल ४४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे, किमान तापमानही २८.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने दिवसाबरोबरच रात्रीचाही उकाडा असह्य झाला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मे महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात तापमान ४४.५ ते ४५.५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
याआधी २७ एप्रिल रोजी ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर काही दिवस तापमानात किंचित घट झाली होती. मात्र, आता पुन्हा उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. दिवसभर तापलेली जमीन रात्रीही थंड होत नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, २५ मेनंतर अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणात बदल होण्याची शक्यता असून, महिनाअखेरीस ढगाळ वातावरणासह वादळी वाऱ्यांसह वळवाच्या पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
उष्णतेची वाढती तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ दरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड