
लातूर, 02 मे, (हिं.स.)। लातूर शहरात एका विशेष क्षणाचा साक्षीदार ठरला रितेश विलासराव देशमुख यांचा बहुचर्चित “राजा शिवाजी” हा चित्रपट मोठ्या उत्साहात प्रदर्शित झाला. लातूरमधील पीव्हीआर टॉकीजमध्ये सकाळपासूनच प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. हातात भगवे झेंडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषांनी परिसर दणाणून गेला होता. तर काहींनी छत्रपतींच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा सोहळा एक उत्सवच बनवला.
हा केवळ एक चित्रपट नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि प्रेरणेचा एक जिवंत अनुभव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय कार्याची, त्यांच्या पराक्रमाची आणि दूरदृष्टीची कहाणी मोठ्या पडद्यावर अनुभवताना अनेकांच्या डोळ्यांत अभिमानाश्रू दाटून आले.
रितेश देशमुख यांनी या चित्रपटाद्वारे केवळ अभिनय नाही, तर एक ऐतिहासिक जबाबदारी उचलल्याची भावना प्रेक्षकांनी व्यक्त केली. मराठी कलाकाराने इतक्या मोठ्या कॅनव्हासवर छत्रपतींचा इतिहास साकारण्याचा प्रयत्न केल्याने लातूरकरांच्या मनात विशेष अभिमान निर्माण झाला आहे.
चित्रपटगृहाबाहेर अनेकांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “हा सिनेमा म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर आपल्या इतिहासाची पुन्हा एकदा ओळख करून देणारा प्रेरणादायी प्रवास आहे.” काही जेष्ठ नागरिकांनी तर हा चित्रपट पाहताना आपले बालपण, शिकलेला इतिहास आणि शिवरायांविषयीची निष्ठा पुन्हा जागी झाल्याचे सांगितले.
आजच्या तरुण पिढीसाठी हा चित्रपट एक संदेश देतो. आपल्या इतिहासाची जाणीव ठेवून, त्यातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा. लातूरसारख्या शहरात अशा ऐतिहासिक चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद हा मराठी संस्कृतीची आणि शिवप्रेमाची जिवंत साक्ष आहे.
एकूणच, “राजा शिवाजी” हा चित्रपट लातूरमध्ये केवळ प्रदर्शित झाला नाही, तर तो प्रत्येकाच्या हृदयात उतरला… आणि पुन्हा एकदा सिद्ध झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis