
नांदेड, 02 मे (हिं.स.)।
खतसाठा, पाणी, वीज पुरवठाबाबत लोकप्रतिनिधी यांच्या सूचना खरीप हंगाम सर्वांनी समन्वय ठेऊन यशस्वी करावा. आगामी हवामान आधारित परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे. शेतकऱ्यांना पाणी, वीज, खतांचा मुबलक साठा उपलब्ध होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. कामात कसूर करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात 'खरीप हंगाम-२०२६' बैठक पार पडली. बैठकीस खासदार अशोक चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी पाटील कल्याणकर, आमदार आनंदराव तिडके (बोंढारकर),आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सावे म्हणाले, बोगस बियाणे, खतांची साठेबाजी, पीक कर्ज देण्यात अडथळा आदी बाबत प्रशासनाने नियमानुसार कारवाई करावी. याबाबत कृषीशी संबंधित असलेल्या शासकीय, खासगी यंत्रणा यांच्याशी बैठक आयोजित करावी. तसेच महावितरण बाबत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत राज्यस्तरावर बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात यईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
खतांची साठेबाजी रोखण्यासाठी भरारी पथके नेमून यावर आळा घालण्याच्या सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या. अल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांना सोलार पंप विहित वेळेत उपलब्ध करुन न देणाऱ्या कंपन्यावर कारवाई करण्यात येईल, असेही निर्देश त्यांनी दिली.
जिल्ह्यात सध्या खताचा मुबलक साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील खताचा साठा इतर राज्यात जावू नये यासाठी भरारी पथके नेमली आहेत. खत उपलब्धतेसाठी क्युआर कोड केले आहेत. क्युआर कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खताची उपलब्धतेची माहिती मिळेल. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा नियमित होण्यासाठी लवकरच शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
जिल्ह्यात अल निनोच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्हा चारा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही बाबीची अडचणी येणार नाहीत याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापक यंत्र लावण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मिर्ची संशोधन केंद्र, सोयाबीन, केळी संशोधन केंद्राचे प्रस्ताव लवकरच शासनास सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नांदेड शहरात कृषी भवनासाठी जागा उपलब्ध करुन याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis