जळगाव एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग
जळगाव, 02 मे, (हिं.स.) जिल्ह्यात एकीकडं उन्हाचा तडाखा वाढला असून यामुळे आगीच्या घटना समोर येत आहे. अशातच जळगाव एमआयडीसीच्या ‘जे’ सेक्टरमधील दोन नामांकित कंपन्यांना आज शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली असून या घटनेने परिसरात प्रचंड मोठी खळब
जळगाव एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग


जळगाव, 02 मे, (हिं.स.) जिल्ह्यात एकीकडं उन्हाचा तडाखा वाढला असून यामुळे आगीच्या घटना समोर येत आहे. अशातच जळगाव एमआयडीसीच्या ‘जे’ सेक्टरमधील दोन नामांकित कंपन्यांना आज शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली असून या घटनेने परिसरात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे.

आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की, संपूर्ण शहरातून धुराचे लोट पाहायला मिळत होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार राजूमामा भोळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली एमआयडीसीमधील ‘जे’ सेक्टरमध्ये असलेल्या ‘जे ब्रदर्स’ आणि ‘श्री एंटरप्रायझेस’ या दोन कंपन्यांना दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. जे ब्रदर्स कंपनीत खोबरेल तेल आणि इतर सुगंधी तेलांचे पॅकिंग केले जाते, तर शेजारील श्री एंटरप्रायझेसमध्ये प्लास्टिकच्या चटया तयार करण्याचे काम चालते. या दोन्ही कंपन्यांमध्ये ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने काही मिनिटांतच आगीने भीषण रूप धारण केले. आग लागल्यानंतर कंपन्यांमधून मोठमोठे स्फोटांचे आवाज येत होते. तेलाचे डबे व रसायनांच्या पिंपांमुळे हे स्फोट होत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या स्फोटांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून आतापर्यंत अग्निशमन दलाचे सहा बंब पाण्याने रिकामे करण्यात आले आहेत. आगीची तीव्रता लक्षात घेता समोर असलेल्या भारत गॅस गोदामातूनही पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, सुदैवाने जीवितहानीची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, दोन्ही कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, आगीची भीषणता आणि एमआयडीसी परिसरातील परिस्थितीची माहिती मिळताच जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष जळणाऱ्या कारखान्यांची आणि सुरू असलेल्या मदतकार्याची पाहणी केली. आमदार भोळे यांनी अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाशी चर्चा करून आग लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नुकसानग्रस्त उद्योजकांना धीर दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande