
बीड, 02 मे (हिं.स.)। जिल्ह्यातील पेट्रोल पंप डीलर असोसिएशनने जिल्हाधिकारी यांना बीड, जिल्हा पुरवठा अधिकारी बीड आणि संबंधित सर्व तहसीलदार यांना जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा व्यवस्थित पुरवठा होत नसल्याबाबत निवेदन दिलेले आहे.
संबंधित पेट्रोल व डिझेल पुरवठादार कंपन्या पैसे भरूनही पेट्रोल पंप धारकांना वेळेवर पुरेसे पेट्रोल व डिझेल पुरवठा करत नसल्याबाबतची तक्रार पंप धारक करत आहेत. कच्च्या तेलाचा भाव कमी असताना सुद्धा कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचा भाव कमी केला नव्हता. मात्र आता युद्धाचे कारण सांगून कच्च्या तेलाचा भाव वाढल्याने पेट्रोल डिझेलचाही भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच डिझेल व पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी होत आहे. मात्र त्या ठिकाणी पेट्रोल व डिझेलचे मुबलक साठे उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना विना इंधन परत जावे लागत आहे. पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सध्या लग्नसराई असल्याने विवाह सोहळ्याला जाण्यासाठी गाड्यांना पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने वरळी मंडळींची सुद्धा हाल होत आहेत.
त्यातच बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नीट परीक्षा सीईटी परीक्षा चा कालावधी आहे. आपल्या गावापासून दूर असलेल्या परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी त्यांना मोटरसायकल किंवा चार चाकी वाहनाने जावे लागते परंतु पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याने या वाहनांचा सुद्धा खोळंबा झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाणे कठीण होत आहे.
जिल्ह्यातील पेट्रोल पंप धारकांना नियमाप्रमाणे पेट्रोल व डिझेल मिळावे यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी तात्काळ युद्ध पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागरिकांची पेट्रोल,डिझेल विना होणारी अडचण थांबवण्यासाठी शासन आणि प्रशासनाने योग्य पावले उचलावीत आणि इंधन पुरवठा कंपन्यांशी संपर्क साधून इंधनपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी जागरूक नागरिकांची अपेक्षा आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis