
वॉशिंग्टन, 02 मे (हिं.स.)पश्चिम आशियातील तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्ष संपवण्यासाठी इराणने पुन्हा एकदा अमेरिकेला शांतता चर्चेचा नवा प्रस्ताव सादर केलाय, पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला मंजुरी दिली नाही.
ट्रम्प म्हणाले की, तेहरान अशा गोष्टींची मागणी करत आहे ज्यावर एकमत होऊ शकत नाही. पण, त्यांनी यावर अधिक स्पष्टीकरण दिले नाही. सुमारे ४० दिवसांच्या भीषण लढाईनंतर अमेरिका आणि इस्रायलने इराणची लष्करी शक्ती मोठ्या प्रमाणात कमकुवत केल्याचा दावा केला असला तरी, आता चित्र वेगळे दिसत आहे.
तेहरानने हल्ल्यांच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला आपला मोठा शस्त्रसाठा बाहेर काढण्यास आणि तो पुन्हा सक्रिय करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अमेरिकेने इस्रायलला सुमारे ६,५०० टन शस्त्रांचा नवा साठा पाठवला आहे आणि इराणवर नवीन हल्ला करण्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने ट्रम्प यांना इराणविरुद्ध प्रथमच डार्क ईगल हायपरसॉनिक क्षेपणास्त्र वापरण्याचा पर्याय सुचवला आहे. इराणच्या नव्या प्रस्तावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत १०९ डॉलरपर्यंत घसरली. सेंटकॉमने (CENTCOM) आतापर्यंत ४५ जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीत परत पाठवल्याचा दावा केला आहे. इराणने गुरुवारी रात्री पाकिस्तानमार्फत ट्रम्प प्रशासनाला चर्चेसाठी एक नवीन प्रस्ताव पाठवला आहे.
या प्रस्तावाचा मुख्य भर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक पूर्ववत करण्यावर असल्याचे म्हटले जाते. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे की, जर अमेरिकेने आपली अत्यंत आक्रमक भूमिका, धमकीवजा वक्तव्ये आणि चिथावणीखोर कृती थांबवल्या, तर तेहरान राजनैतिक चर्चा करण्यास तयार आहे. पण, अराघची यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर असेही म्हटले आहे की, इराणी सैन्य कोणत्याही धोक्यापासून देशाचे संरक्षण करण्यास सज्ज आहे.
इराणच्या नवीन प्रस्तावाबाबत ट्रम्प म्हणाले की, ते त्यावर समाधानी नाहीत आणि पुढे काय होते ते पाहतील. ते म्हणाले की, ते फोनवर बोलत होते, पण इराणी नेतृत्वाबद्दल खूप निराशा होती आणि ते आपापसात विभागलेले होते. त्यांना तडजोड करायची आहे, पण ते अडकले आहेत. ते अशा गोष्टीची मागणी करत आहेत, जी मी मान्य करू शकत नाही.
इराणला अण्वस्त्रे मिळवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने इशारा दिला आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्गासाठी इराणला टोल देणाऱ्या जहाज वाहतूक कंपन्यांवर निर्बंध लादले जाऊ शकतात, जरी तो पैसा देणगी स्वरूपात किंवा परोपकारी हेतूने दिलेला असला तरीही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे