अधिक मासात पंढरीत भाविकांची गर्दी; दर्शन रांगेत तासन्तास प्रतीक्षा
सोलापूर, 25 मे (हिं.स.) अधिक मासानिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी दररोज लाखो भाविक दाखल होत आहेत. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर तुळशी अर्चन आणि इतर पूजांमुळे दर्शन रांग वारंवार थांबविण्यात येत असल्याने पदस्पर्श दर्शनासाठी आलेल्या भावि
Vithal


सोलापूर, 25 मे (हिं.स.) अधिक मासानिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी दररोज लाखो भाविक दाखल होत आहेत. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर तुळशी अर्चन आणि इतर पूजांमुळे दर्शन रांग वारंवार थांबविण्यात येत असल्याने पदस्पर्श दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तासन्तास एकाच ठिकाणी थांबावे लागत आहे. त्यामुळे अधिक मासात पूजांची संख्या कमी करून दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. मात्र, मंदिर प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.

शनिवार-रविवारची सुट्टी आणि शाळांना सुट्ट्या असल्याने भाविकांची गर्दी अधिक वाढली आहे. दर्शन रांग मंदिर परिसरातून पत्राशेडपर्यंत पोहोचली आहे. भाविकांसाठी वॉटरप्रूफ दर्शन रांग उभारण्यात आली असली, तरी शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे अनेक भाविकांना भिजतच रांगेत थांबावे लागले.रात्रीच्या वेळी पिण्याचे पाणी आणि चहाची सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार भाविकांनी केली. तसेच दर्शन रांगेत पुरेसा पोलिस बंदोबस्त आणि सुरक्षा रक्षक नसल्याने घुसखोरीच्या घटना वाढत असून, त्यातून वादावादी होत असल्याचेही समोर आले आहे.

शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे दर्शन रांगेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यातच रांगेच्या बाजूला विद्युत केबल उघड्या अवस्थेत असल्याने भाविकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिर समिती आणि नगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराबद्दल वारकरी आणि भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande