
* प्रिंटिंग आणि पॅकेजिंग क्षेत्रातील विस्तारासाठी कंपनी उभारणार निधी
मुंबई, 25 मे (हिं.स.) : मध्य भारतातील प्रिंटिंग आणि पॅकेजिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'शक्ती प्रेस लिमिटेड'ने (BSE: 526841) आपल्या विस्तार योजनांसाठी ₹४९.२८ कोटी रुपयांचा राइट्स इश्यू बाजारात आणला आहे. या इश्यू अंतर्गत गुंतवणूक करण्याची प्रक्रिया ७ मे पासून सुरू झाली असून, ती २९ मे २०२६ रोजी बंद होणार आहे. तर राइट्सच्या हक्कांचे स्टॉक एक्सचेंजवर हस्तांतरण (Renunciation) करण्याची अंतिम तारीख २५ मे २०२६ आहे.
कंपनीने या राइट्स इश्यूसाठी प्रति शेअर ₹२० ही किंमत निश्चित केली आहे. विशेष म्हणजे १४ मे रोजी बाजार बंद होताना कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे ₹२६.८५ इतकी होती, जी राइट्स इश्यूच्या किमतीपेक्षा अधिक असल्याने विद्यमान भागधारकांसाठी ही एक फायदेशीर संधी ठरू शकते. या इश्यूचे प्रमाण ७:१ असे ठेवण्यात आले आहे, म्हणजेच गुंतवणूकदारांकडे असलेल्या प्रत्येक १ मूळ शेअरमागे ७ राइट्स शेअर्स खरेदी करता येतील. याद्वारे कंपनी ₹१० दर्शनी मूल्य असलेले एकूण २,४६,४१,४०० नवीन शेअर्स जारी करणार आहे.
या निधीचा वापर कंपनी आपल्या प्रिंटिंग आणि पॅकेजिंग व्यवसायातील तंत्रज्ञान सुधारण्यासाठी, क्षमता वाढवण्यासाठी आणि आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी करणार आहे. नागपूरस्थित शक्ती प्रेस लिमिटेडला या क्षेत्रातील ६० वर्षांहून अधिक काळचा दांडगा अनुभव आहे.
आर्थिक कामगिरी मजबूत
आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या नऊ महिन्यांत कंपनीने उत्तम कामगिरी केली आहे. या काळात कंपनीला ₹१२.७२ कोटींचे एकूण उत्पन्न, ₹२.२६ कोटींचा कार्यान्वयीन नफा (१८.१५% मार्जिन) आणि ₹७३.२५ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. हा निधी आमच्या कामकाजाची कार्यक्षमता वाढवून भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करेल, असा विश्वास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राघव कैलाशनाथ शर्मा यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी