
सोलापूर, 25 मे (हिं.स) । सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपचे संख्याबळ मजबूत असल्याने ही निवडणूक केवळ औपचारिकता उरली आहे. सोलापूर जिल्ह्यात नवा इतिहास घडवण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल, असा दावा मंत्री जयकुमार गोरे यांनी केला.सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधतानाजयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील जागावाटप, मोहिते-पाटील गट, राज्यातील इंधन टंचाईच्या अफवा आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ ट्रेंडवर भाष्य केले.“आमदार राजेंद्र राऊत आणि मी एकाच विमानातून सोलापूरला आलो,यावरून वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने जिल्ह्यात मोठे यश मिळवले आहे. आमचे संख्याबळ अधिक असल्याने अनेक कार्यकर्ते इच्छुक असणे स्वाभाविक आहे,” असे ते म्हणाले.
विरोधकांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, “विरोधकांनी कितीही एकत्र येण्याचा प्रयत्न केला तरी ते 100 मतांच्या पुढे जाऊ शकत नाहीत. जिल्ह्यात काँग्रेसचे पाच आणि एमआयएमचे नऊ मतदार आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आवश्यकता भासल्यास सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून सोलापूरची जागा बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”दरम्यान, राज्यात पेट्रोल-डिझेल टंचाईबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्रासाठी आवश्यक असलेला इंधनसाठा पुरेसा उपलब्ध आहे. नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी काही जण अफवा पसरवत आहेत. त्यामुळे नागरिक गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी करत आहेत. काही पेट्रोल पंपांवर तात्पुरता परिणाम दिसत असला तरी राज्यात कुठेही इंधनाची टंचाई नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड