
सोलापूर, 26 मे (हिं.स.)।सोलापुर जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार, २८ जून २०२६ रोजी राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील पाच वर्षांखालील ४ लाख ३६ हजार ५७२ बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी आरोग्य यंत्रणेला मोहिमेचे नियोजन प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी कोल्ड चेन, वाहन व्यवस्था, मनुष्यबळ आणि जनजागृती यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात ५५७०, शहरी भागात ५७० आणि महानगरपालिका क्षेत्रात ३७३ असे एकूण हजारो लसीकरण बूथ उभारण्यात आले आहेत. मोहिमेसाठी ७२२२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठ, विटभट्टी, साखर कारखाने, यात्रा आणि लग्न समारंभ यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी विशेष लसीकरण व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच भटक्या व उसतोड कामगारांच्या वस्त्यांमध्ये मोबाईल टीमद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे.प्रभातफेरी आणि जनजागृती अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड