वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, कुसल मेंडिसची कर्णधारपदी नियुक्ती
कोलंबो, 26 मे (हिं.स.)। श्रीलंकेच्या एकदिवसीय आणि टी-२० संघांचा कर्णधार पुन्हा बदलला आहे. कुसल मेंडिसची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघाचे नेतृत्व करेल. गेल्या सहा महिन्यांत कुसल मेंडिस हा श्रीलंकेचा तिसरा एकदिव
श्रीलंकन क्रिकेट बोर्ड लोगो


कोलंबो, 26 मे (हिं.स.)। श्रीलंकेच्या एकदिवसीय आणि टी-२० संघांचा कर्णधार पुन्हा बदलला आहे. कुसल मेंडिसची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघाचे नेतृत्व करेल. गेल्या सहा महिन्यांत कुसल मेंडिस हा श्रीलंकेचा तिसरा एकदिवसीय आणि टी-२० कर्णधार असेल. यापूर्वी चरित असलंका या पदावर होता. त्यानंतर, २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी दसुन शनाकाची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यालाही हटवण्यात आले आहे. मेंडिसला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेटच्या नवीन निवड समितीने घेतला आहे. पण, कसोटी सामन्यांमध्ये धनंजय डी सिल्वा कर्णधारपदी कायम आहे.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यापर्यंत असलंका श्रीलंकेचा कर्णधार होता. तेथील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मायदेशी परतण्याची मागणी केल्यानंतर श्रीलंका क्रिकेटने त्याच्याकडून टी-२० कर्णधारपद काढून घेतले होते. डिसेंबरमध्ये शनाकाची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याने टी-२० विश्वचषकादरम्यानही नेतृत्व केले होते, पण आता त्यालाही पदावरून दूर करण्यात आले आहे. मेंडिसच्या कर्णधारपदाखाली, असलंकासह १६ क्रिकेटपटूंची वेस्ट इंडिजमधील एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली आहे. मात्र, त्याला टी-२० फॉरमॅटमधून वगळण्यात आले आहे. कामिंदू मेंडिसला टी-२० संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

श्रीलंका दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ३ जून रोजी एकदिवसीय सामन्यांनी होईल आणि तो ८ जूनपर्यंत चालेल. त्यानंतर ११ ते १४ जून दरम्यान टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका सुरू होईल. अखेरीस, २५ जून ते ७ जुलै दरम्यान कसोटी सामने सुरू होतील.

लेग-स्पिनर वानिंदू हसरंगा या दौऱ्यावर पुनरागमन करणार आहे. तो एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही संघांमध्ये आहे. फेब्रुवारीनंतर तो पहिल्यांदाच खेळणार आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता, ज्यामुळे त्याला आयपीएल २०२६ मध्येही सहभागी होता आले नाही. वेगवान गोलंदाज नुवान थुशाराने टी२० संघात पुनरागमन केले आहे. तोही जखमी आहे. मथिशा पाथिराना अजूनही संघाबाहेर आहे. आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याला पुन्हा दुखापत झाली.लसिथ कृसिपुलेचा श्रीलंकेच्या टी२० संघात प्रथमच समावेश करण्यात आला आहे. फलंदाज पसिंदू सुरियाबंदारा आणि २९ वर्षीय गोलंदाजी अष्टपैलू इसिथा विजेसुंदरा यांचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande