
धुळ्याच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक, 30 मे (हिं.स.)। दाखल असलेल्या गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी एका मेडिकल दुकानदारांकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागून धमकी देणाऱ्या धुळ्याच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मयूर प्रकाश अलई (रा. गार्डन व्ह्यू अपार्टमेंट, गुलमोहर कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक ) हे मेडिकल व्यावसायिक आहेत. आरोपी राजेंद्र अमृतकर (वय ५५), योगीता अमृतकर (वय ४५), मुलगी गायत्री श्रीरंग कोठावदे (वय ३५), मुलगा प्रसाद राजेंद्र अमृतकर (वय २५, सर्व रा. सोनगीर, ता. जि. धुळे), मनोज दशपुते (वय ४५, रा. कासारे, ता. साक्री, जि. धुळे), प्रमोद डेरे (वय ५०, रा. सोनगीर, ता. जि. धुळे) व मधुकर भोकरे (वय ६५, रा. मु. पो. ता. पाचोरा, जि. जळगाव) यांनी संगनमत करून फिर्यादीच्या मोबाईलवर आरोपी मध्यस्थ प्रमोद डेरे याच्या मोबाईलवरून संवाद साधला, तसेच फिर्यादीच्या महात्मानगर येथे असलेल्या मेडी प्लॅनेट मेडिकल स्टोअर्सवर येऊन फिर्यादीची भेट घेतली. फिर्यादीवर सोनगीर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातून फिर्यादीचे नाव वगळण्यासाठी वेळोवेळी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली, तसेच ही रक्कम दिली नाही, तर फिर्यादी किंवा फिर्यादीच्या कुटुंबाच्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. हा प्रकार दि. ३ सप्टेंबर २०२२ ते दि. २६ मे २०२६ या कालावधीत फिर्यादीच्या दुकानात घडला.या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध खंडणीसह धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV