समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या ‘समर्थ’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित
मुंबई, 30 मे (हिं.स.)। समर्थ रामदास स्वामींचे विचार आणि समाजप्रबोधनाची शिकवण आजच्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रेक्षकांच्या भेटीला येणारा थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत, ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर
‘समर्थ’


मुंबई, 30 मे (हिं.स.)। समर्थ रामदास स्वामींचे विचार आणि समाजप्रबोधनाची शिकवण आजच्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रेक्षकांच्या भेटीला येणारा थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत, ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ हा चित्रपट ऑगस्ट २०२६ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पुण्यातील उद्योगपती तसेच रामकथा प्रवचनकार श्री. रवींद्र पाठक यांच्या मूळ संकल्पनेतून साकारत असलेल्या या चित्रपटाविषयी सध्या सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे.

अधिक मासानिमित्त आळंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री रामकथा मानस पसायदान’ या विशेष प्रवचन कार्यक्रमात ‘समर्थ’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे भव्य अनावरण करण्यात आले. आध्यात्मिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला भाविक आणि उपस्थित मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी बोलताना श्री. रवींद्र पाठक म्हणाले, “‘समर्थ’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, समर्थ रामदास स्वामींचे विचार आजच्या काळात किती प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरू शकतात, हे नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येणार आहे.”

चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुप्त ठेवण्यात आली असून, त्याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश फुलफगर म्हणाले, “समर्थ रामदास स्वामींचे विचार हे आजही समाजासाठी तितकेच महत्त्वाचे आणि प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांची ओळख नव्या पिढीला आधुनिक माध्यमातून करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.”

येत्या ऑगस्ट २०२६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘समर्थ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश फुलफगर यांनी केले आहे. चित्रपटाची मूळ कथा आणि निर्माते श्री. रवींद्र पाठक आहेत, तर कथाविस्तार व पटकथा आशुतोष भोसेकर यांची आहे. संवाद मानस लयाळ यांनी लिहिले असून, चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आणि कार्यकारी निर्माते अमोल भगत आहेत.

समर्थ रामदास स्वामींच्या विचारसंपदेची आणि समाजप्रबोधनाच्या संदेशाची आधुनिक पद्धतीने मांडणी करणारा ‘समर्थ’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायी, विचारप्रवर्तक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अनुभव ठरणार आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडे आता रसिकांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande