राज्यात पीसीओडीसाठी जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांत विशेष क्लिनिक सुरू होणार
अमरावती, 31 मे (हिं.स.) बदलती जीवनशैली, अयोग्य आहारपद्धती, वाढता मानसिक ताण आणि व्यायामाचा अभाव यामुळे महिलांमध्ये ‘पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसॉर्डर’ (पीसीओडी) या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महिलांच्या आरोग्याच्
राज्यात पीसीओडीसाठी जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांत विशेष क्लिनिक सुरू होणार


अमरावती, 31 मे (हिं.स.)

बदलती जीवनशैली, अयोग्य आहारपद्धती, वाढता मानसिक ताण आणि व्यायामाचा अभाव यामुळे महिलांमध्ये ‘पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसॉर्डर’ (पीसीओडी) या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील सर्व जिल्हा, स्त्री व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये विशेष पीसीओडी क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे महिला आणि तरुणींना एकाच ठिकाणी तज्ज्ञांचे उपचार, समुपदेशन आणि मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.पीसीओडी हा महिलांमधील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे निर्माण होणारा विकार आहे. यामध्ये अंडाशयात लहान गाठी तयार होतात. जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप, आनुवंशिकता, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यांमुळे शरीरातील अॅन्ड्रोजन हार्मोनचे प्रमाण वाढते. परिणामी मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, चेहर्यावर व शरीरावर अनावश्यक केस येणे, पिंपल्स, केस गळणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.तज्ज्ञांच्या मते, पीसीओडीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात वंध्यत्व, गर्भपात, मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे या आजाराचे वेळीच निदान व उपचार होणे आवश्यक आहे.या क्लिनिकमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ यांची विशेष चमू कार्यरत राहणार असून रुग्णांची सखोल तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार दिले जातील.विशेष म्हणजे, या क्लिनिकमध्ये तपासणी, निदान, समुपदेशन तसेच आवश्यक औषधे आणि टॉनिक्स पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांमधील महागड्या उपचारांचा आर्थिक बोजा सर्वसामान्य महिलांवर पडणार नाही.याशिवाय, वयाच्या 40 ते 50 वर्षांदरम्यान मेनोपॉजच्या टप्प्यातील महिलांसाठी प्रत्येक शासकीय रुग्णालयात दर बुधवारी विशेष ‘मेनोपॉज ओपीडी’ चालविण्यात येणार आहे. हाडे ठिसूळ होणे, चिडचिड, अंगदुखी आणि हार्मोनल बदलांशी संबंधित समस्यांवर या ओपीडीमध्ये उपचार व समुपदेशन दिले जाईल.शासनाच्या या निर्णयामुळे महिलांच्या आरोग्यसेवेला नवी दिशा मिळणार असून पीसीओडीसारख्या वाढत्या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande