
सोलापूर, 31 मे, (हिं.स.)। सोलापूर विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या असताना भाजपकडून अद्याप उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्ष नेमका कोणाला संधी देणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असून इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. पुढील काही तासांत भाजपकडून उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या जागेसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राऊत तसेच जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या नावांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विशेषतः पंढरपूर विधानसभा मतदारसंघात या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी 2021 च्या पोटनिवडणुकीत तसेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार माघार घेत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देत विजयासाठी काम केले होते. त्यामुळे यावेळी पक्ष त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार करेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. उमेदवारीबाबत विविध दावे आणि चर्चांना सोशल मीडियावरही उधाण आले आहे. दरम्यान, परिचारक यांच्या एका समर्थकाने रक्ताने पत्र लिहून त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली असून उमेदवारी न मिळाल्यास नदीत उडी घेण्याचा इशाराही दिला आहे.
दुसरीकडे, माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे नावही सध्या आघाडीवर मानले जात आहे. बार्शी तालुक्यात भाजप संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करत त्यांच्या समर्थकांकडून उमेदवारीची जोरदार मागणी केली जात आहे. त्यामुळे परिचारक आणि राऊत या दोन प्रमुख दावेदारांमध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे.
अशा परिस्थितीत कोणत्या नावाला संधी द्यायची आणि एखाद्या इच्छुकाला डावलल्यास त्याचे भविष्यातील राजकीय परिणाम काय होऊ शकतात, याचा भाजप नेतृत्व गांभीर्याने विचार करत असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, गत महिन्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी पक्षाने संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देत धक्कादायक निर्णय घेतला होता. त्यामुळे सोलापूरच्या जागेसाठीही पक्ष कोणता राजकीय डाव टाकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड